Wednesday, January 17, 2018

पारदर्शकतेबरोबरच कामांची गती वाढविण्यावर भर द्या -विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी


पुणे दि. 12: ग्रामपातळीवर निधी अभावी प्रलंबीत असणाऱ्या कामांशी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची योग्य सांगड घालून अशी सर्व कामे तातडीने मार्गी लावावीत. कोणतेही शासकीय काम करताना पारदर्शकतेला महत्व आहेच, मात्र त्याबरोबरच अशा कामांची गती वाढविण्याच्या सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी आज दिल्या.
            येथील उपायुक्त कार्यालयाच्या सभागृहात गुड गव्हर्नन्स इनिशीएटिव्ह विभागस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपायुक्त (रोहियो) जयंत पिंपळगावकर, उपसचिव (रोहियो) प्रमोद शिंदे, विनयकुमार आवटे, गुड गव्हर्नन्स इनिशीएटिव्ह श्रुती सिंग, अनिलकुमार कट्टा, सिटीझन इनफॉरमेशन बोर्डचे चिराग धुम, सुचरिता थोरात उपस्थित होते.
            चंद्रकांत दळवी म्हणाले, या विभागीय स्तरावरील गुड गव्हर्नन्सच्या कार्यशाळेच्याधर्तीवर तालुकास्तरापर्यंत कार्यशाळा व्हाव्यात, या माध्यमातून ग्रामपातळीवरील शासनाच्या सेवकांना याचे ट्रेनिंग मिळावे. ग्रामपातळीवर अनेक कामे आहेत, या कामासाठी निधी हवा आहे. मनरेगामध्ये निधीची कोणतीही कमतरता नाही. अशा कामांना मनरेगाच्या कामांत अंतर्भुत करावे, त्यामुळे ही कामे मार्गी लागतील. मनरेगाच्या माध्यमातून अधिकाधिक कामे कशी करता येतील यावर भर द्यावा. मनरेगाच्या कामांचे पुढील वर्षीचे नियोजन करताना त्यामध्ये काय नावीन्यपूर्ण करता येईल याची चर्चा करावी. मनरेगाचा फायदा विभागातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहाचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
            या कार्यशाळेत प्रमोद शिंदे, श्रुती सिंग, अनिलकुमार कट्टा, सुचरिता थोरात, श्री  काकडे, संदीप कोहिनकर, शैलेश सुर्यवंशी, चिराग धुम, संजय पाटील यांनी मार्गदर्शन केले.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंत पिंपळगावकर यांनी केले. सूत्र संचालन विनयकुमार आवटे यांनी केले. तर आभार सुचरिता थोरात यांनी मानले. या कार्यशाळेला पुणे विभागातील मनरेगाचे उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मनरेगाचे गट विकास अधिकारी उपस्थित होते.
*****


Friday, December 8, 2017

ग्रामीण भागातील ग्राहकांच्या जनजागृतीवर भर द्यावा -अरुण देशपांडे



 पुणेदि.8:- राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त राज्य शासन आणि जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या वतीने  15 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत 'ग्राहक जनजागृती पंधरवडा' साजरा करण्यात येणार आहे. या पंधरवडयात  जिल्हयातील शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील ग्राहकांच्या जनजागृतीवर भर द्यावा,  अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत कार्यरत राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समिती व राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी दिल्या.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरील शासकीय व अशासकीय सदस्यांसोबत ग्राहक संरक्षण विषयासंबंधीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहामध्ये श्री.देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी  उपस्थित संबंधितांना त्यांनी ही सूचना केली. या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त एस. पी. शिंदे, वैधमापनशास्त्र विभागाचे सहायक नियंत्रक नितीन उदमले तसेच शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते. 
दरवर्षी 24 डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात येतो. ग्राहकांना त्यांचे हक्क व कर्तव्य यांची माहिती सर्वसामान्यांना करुन देण्यासाठी या पंधरवडयामध्ये  विविध विभागांनी ग्राहक जागृतीपर स्टॉल लावण्याबरोबरच नवनविन उपक्रम राबवावेत. या उपक्रमात स्थानिक शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, ग्राहक पंचायत यांचा सहभाग घ्यावा. जेणेकरुन अधिकाधिक ग्राहकांपर्यंत ग्राहक संरक्षण कायदयाची माहिती पोहोचून ग्राहक सुजाण होईल.  तसेच ग्राहक जनजागृतीपर घडीपत्रिका, पत्रके वाटप करणे, पथनाटय, भारुड, ग्राहक दिंडीच्या माध्यमातून ग्राहकांच्या हक्काची माहिती देण्यात यावी. या सर्व कार्यक्रमांचा अहवाल राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीला पाठविण्यात यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्राचीन आणि अधुनिक विज्ञानाची सांगड घालून शास्त्रज्ञांनी समन्वयाचा पूल उभारावा - राज्यपाल चे . विद्यासागर राव


राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या 87 व्या वार्षिक सत्राचे थाटात उद्घाटन
पुणे दि.8 : राष्ट्रीय विज्ञान अकादमी ही भारतातील अनेक वर्षांची उज्ज्वल परंपरा असणारी सर्वात मोठी विज्ञान संस्था आहे, देशातील विज्ञानाला लोकप्रिय करण्यासाठी आणि त्याचा प्रसार करण्यासाठी या संस्थेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. लोकांच्या जीवनातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी संशोधन करण्याबरोबरच अधुनिक विज्ञान आणि पारंपारिक भारतीय विज्ञान यांच्यात सांगड घालून समन्वयाचा पूल निर्माण करण्याचे काम राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या शास्त्रज्ञांनी करण्याचे अवाहन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज केले.
येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या चंद्रशेखर सभागृहात राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या (एनएएसआय) 87 व्या वार्षिक सत्रानिमित्त बेसिक रिसर्च:इटस् रोल अन नेशन डेव्हलपमेंट या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या वार्षिक सत्राचे उद्घाटन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, इस्त्रोचे चेअरमन डॉ. किरण कुमार, पद्मविभूषण डॉ. मंजू शर्मा, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या पुणे विभागाचे अध्यक्ष प्रा. दिलीप ढवळे, एनएसआयच्या सचिव डॉ. वीणा टंडन आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल चे. विद्यासागर राव म्हणाले, भारतीय विज्ञानाला मोठी परंपरा आहे. एकेकाळी भारतीय विज्ञान सर्वात अग्रेसर होते. मात्र परदेशी वर्चस्वामुळे भारतीय विज्ञानाला झाकोळून टाकले आहे. प्राध्यापक एम.जे.के. मेनन, प्राध्यापक एम.एस. स्वामीनाथन आणि आता डॉ. अनिल काकोडकर यासारख्या शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय विज्ञान अकादमीने भरीव काम केले आहे. त्यामुळे भारत विज्ञान क्षेत्रातील आपले पूर्वीचे अव्वल स्थान पुन्हा प्राप्त करेल. विज्ञानाच्या मदतीनेच भारत गरिबी, उपासमार, अज्ञान, रोगराई, स्वच्छता, कुपोषण, पाणी आणि ऊर्जा सुरक्षा यासारख्या आव्हानांना सामोरे जाऊ शकतो. गेल्या काही दशकांत भारताने माहिती तंत्रज्ञान, स्पेस सायन्स, न्यूक्लियर सायन्स, फार्मास्युटिकल्स, मेडिसीन आणि इतर क्षेत्रात क्षेत्रात मोठी प्रगती केलेली आहे.
देशाच्या प्रगतीसाठी विज्ञान हा अत्यंत महत्वाचा विषय असल्याचे स्पष्ट करून ते पुढे म्हणाले, गणित आणि‍ विज्ञानाकडे विद्यार्थ्यांचा ओढा निर्माण व्हावा यासाठी शालेयस्तरापासून विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. त्याच बरोबर शालेय स्तरापासून महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत अधिक चांगले विज्ञान शिक्षक तयार करण्याची आवश्यकता आहे. मुलांना विज्ञान विषय अधिक रंजक प्रकारे शिकविण्यासाठी विज्ञानाच्या शिक्षकांना प्रशिक्षीत करण्याची आवश्यकता आहे. विज्ञान क्षेत्रात संशोधन करणाऱ्या संस्थांनी यासाठी विशेष प्रयत्न करून शिक्षण संस्था आणि सामान्य जनता यांच्याबरोबर चांगला संवाद सुरु करावा. शिक्षण संस्था आणि संशोधन संस्थांना केंद्रस्थानी ठेवून आपण काम करण्याची आवश्यकता आहे. अनेक देशात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विज्ञान महोत्सव सुरू असतात, त्याच धर्तीवर आपल्या राज्यात विज्ञान संस्था आणि प्रत्येक विद्यापीठांच्या विज्ञान विभागात दरवर्षी विज्ञान महोत्सवाचे आयोजन करावे. 
            डिजीटल क्रांतीमुळे देशात माध्यमांची संख्या झपाट्याने वाढली आहे. विज्ञानाच्या प्रचार आणि प्रसारासाठी माध्यमांनीही आपले योगदान द्यावे. त्यासाठी विविध विज्ञान विषयक कार्यक्रमांना माध्यमांनी प्रसिध्दी द्यावी. गेल्या काही दिवसात भारत सरकारने संशोधन आणि विकासास प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपाय, धोरणात्मक निर्णय घेवून काम सुरु केले आहे. नाविन्याला आणि उद्यमशीलतेला प्रोत्साहित करण्यासाठी सरकारने स्टार्टअप इंडिया कार्यक्रम सुरू केला आहे. यामुळे देशात चांगले वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
            डॉ. अनिल काकोडकर म्हणाले, भारत हा वेगाने विकसीत होणारा देश आहे. देशाच्या विकासाच्या या प्रक्रीयेत विज्ञानाचे अनन्यसाधारण महत्व आहे. सामान्य लोकांच्या जीवनात अधिक सुखकर परिवर्तन होण्यासाठी विज्ञान संस्था प्रयत्नशील असतात. अशा संस्थांना आणि वैज्ञानिकांना प्रोत्साहन, मार्गदशर्न करण्याचे करण्याचे काम राष्ट्रीय विज्ञान अकादमी करत आहे. देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी हा परिसंवाद उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.
            यावेळी विविध क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या डॉ. अनिल कुमार, देबाशीष चटोपाध्याय, इन्साद अली खान या शास्त्रज्ञांचा राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या वार्षिकीचे प्रकाशन करण्यात आले.
            यावेळी दलीप ढवळे, मंजू शर्मा, किरण कुमार यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नितीन करमळकर यांनी केले. तर आभार डॉ. वीणा टंडन यांनी मानले. या कार्यक्रमाला देशातील विविध राज्यातील शास्त्रज्ञ, विद्यार्थी, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
******

















  

Saturday, December 2, 2017

शिलालेखामुळे हत्तरसंग कुडलला राष्ट्रीय स्तरावर ओळख : सहकारमंत्री



सोलापूर दि.2 :- श्री. संगमेश्वर मंदिरात असलेल्या मराठी भाषेतील शिलालेखामुळे हत्तरसंग कुडल गावाला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे, असे प्रतिपादन सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे व्यक्त केले.
सोलापूर जिल्ह्यातील हत्तरसंग कुडल येथील प्राचीन शिलालेख आणि मंदिर समूहाबाबत आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्राच्या उद्घाटनाच्या सत्रात श्री. देशमुख बोलत होते. हत्तरसंग कुडल येथे आज झालेल्या या चर्चासत्राचे आयोजन राज्य शासनाच्या पुरातत्वशास्त्र विभाग, सोलापूर विद्यापीठ आणि लोकमंगल फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी कुलगुरू डॉ. ए.एन.मालदार, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे माजी कुलपती डॉ.गो.ब.देगलूरकर, परातत्व व वस्तुसंग्रहालये विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, प्रा.डॉ. अभिजीत दांडेकर, सहाय्यक संचालक विलास वहाणे, डॉ.माया पाटील, संगमेश्वर मंदिर समितीचे अध्यक्ष षडाक्षरी बिराजदार, सरपंच मधुकर बिराजदार आदी उपस्थित होते.
सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, ‘सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी भारतीय संस्कृतीच्या खुणा असलेली मंदिरे आहेत. ही मंदिरे शिल्प यांचे संवर्धन करण्याचा आणि लोकांपर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. हत्तरसंग कुडल येथील शिलालेखाबाबत आज होणारे चर्चासत्र याबाबतीत अतिशय महत्वाचे आहे.’
सोलापूर जिल्ह्यात धार्मिक स्थळे आहेत. जिल्ह्याला संत आणि वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे एका सर्किटमध्ये जोडली तर धार्मिक पर्यटनाचा विकास होईल आणि त्यातून रोजगार निर्मितीला चालना मिळेल, मात्र त्यासाठी आपण दृष्टीकोनात बदल करण्याबरोबरच नव नवीन कौशल्ये आत्मसात करायला हवीत, असे श्री. देशमुख म्हणाले.
डॉ. देगलूरकर म्हणाले, ‘भारतीय संस्कृती प्राचीन आहे. मंदिर आणि मूर्ती आपल्या संस्कृतीमध्ये मुख्य वैशिष्ट्य आहे. संस्कृती संरक्षीत ठेवण्यासाठी मंदिर आणि मूर्तीकलांचा अभ्यास होण्याची आवश्यकता आहे. यासाठी पुरातत्वशास्त्र अतिशय महत्वाचे आहे.
यावेळी डॉ. मालदार यांचेही भाषण झाले. डॉ. माया पाटील आणि डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रा. ज्ञानेश्वरी हजारे यांनी आभार मानले.
तत्पुर्वी, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी चर्चासत्रासाठी आलेल्या संशोधकासमवेत मंदिर समूह आणि शिलालेखाची पाहणी केली.









Thursday, November 23, 2017

राज्यात येत्या दोन वर्षात 22 हजार किलोमीटरचे महामार्ग सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती


सोलापूर दि. 23 :-  राज्यात येत्या दोन वर्षात 22 हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग तयार केले जाणार आहेत. या महामार्गाच्या निर्मितीला केंद्र सरकारने मंजूरी दिली असून त्यासाठी एक लाख सहा हजार कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज येथे दिली.
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक झाली. त्या बैठकीत ते बोलत होते. सार्वजनिक बांधकाम भवनच्या कुमठा नाका येथील बांधकाम भवन येथे ही बैठक झाली. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, मुख्य अभियंता प्रविण भिडे, अधीक्षक अभियंता राजेश पाटील आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की, येत्या दोन वर्षात रस्ते विकासाच्या माध्यमातून राज्याचे चित्र बदलण्याचा प्रयत्न आहे. बावीस हजार किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्ग विकासातून आर्थिक प्रगती शक्य होईल. हे सर्व महामार्ग चार पदरी आहेत.भारतमाला प्रकल्पातून राज्यात 6500 किलोमीटरचे सहा पदरी रस्ते होणार आहेत.
राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील निवासी इमारतीचे बळकटीकरण करण्याचे धोरण आखत आहोत. यामुळे इमारतीचे आयुष्य आणखी दहा ते पंधरा वर्षे वाढेल अशी अपेक्षा असल्याचे श्री.पाटील यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निधीत कपात केली जाऊ नये अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करणार आहोत. ही विनंती मान्य झाल्यास भरघोस निधी मंजूर होईल. त्यातून प्रलंबित देयके देणे शक्य होईल, त्याचबरोबर नवीन कामांना निधी देणे शक्य होईल, असे श्री.पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व प्रमुख मार्गावरील रस्त्यांवरील खड्डे मुजविण्याचे काम तातडीने हाती घ्यावे. 15 डिसेंबर 2017 पूर्वी खड्डे मुजविण्याचे काम पूर्ण करा अशा सूचना त्यांनी दिल्या.
टेंभुर्णी – करमाळा रस्त्यासाठी निधी मुजूर करण्यात आला आहे. सोलापूरच्या महसूल भवनाच्या फर्निचरसाठीही निधी दिला जाईल. कार्यालयीन इमारत पुर्ण झाल्यावर संबंधित विभागाकडे हस्तांतरीत केली जावी असेही श्री. पाटील यांनी सांगितले.
******



Monday, November 20, 2017

भूसंपादन प्रक्रीया गतीमान होण्यासाठी महसूल विभागाने यंत्रणा कार्यान्वित करावी -महसूलमंत्री चंद्रकांत पाटील


                                                          
पुणे दि. 20 : राज्यातील विविध विकास प्रकल्पांसाठी करण्यात येत असलेल्या भूसंपादनाच्या प्रक्रियेत सुसूत्रीकरण व्हावे.  ही प्रक्रिया गतीने व्हावी, त्यासाठी महसूल विभागाने यंत्रणा कार्यान्वित करावी, असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज केले.
महसूल आणि वन विभागाच्यावतीने आज भूसंपादन, पुनर्वसन आणि महसूलविषयक बाबींसंदर्भात   राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी श्री. पाटील बोलत होते. यावेळी महसूल राज्यमंत्री संजय राठोड, वन विभागाचे सचिव विकास खारगे, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, नाशिक विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्यासह महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, राज्यात विविध विकास प्रकल्प सुरु आहेत. भूसंपादनाची प्रक्रिया गतिमानव सुटसुटीत होणे आवश्यक आहे. जेणे करुन शासनाचे महत्वाचे प्रकल्प विहित वेळेत पूर्ण होतील व प्रकल्पाच्या किंमतीत वाढ होणार नाही. तसेच विकास प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या नागरिकांनाही त्याचा मोबदला वेळेत मिळायला हवा. त्यांना त्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास आणि विलंब होता कामा नये याची दक्षता आपण घ्यायला हवी.
भूसंपादन आणि पुनर्वसन विषयक प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी कायदे आणि नियमात दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्यास त्यासाठी शासन सकारात्मक असेल. भूसंपादन प्रक्रिया राबविताना येणाऱ्या अडचणींबाबत अशाप्रकारे पहिलीच परिषद होत आहे यातून ही प्रक्रिया गतिमान होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास श्री. पाटील यांनी व्यक्त केला.
परिषदेस राज्यातील विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, अतिरीक्त जिल्हाधिकारी, पुनर्वसन अधिकारी उपजिल्हाधिकारी उपस्थित होते.

*****



गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळा डिजीटल होणे गरजेचे : सहकारमंत्री देशमुख यांचे प्रतिपादन




सोलापूर दि. 20  :- शालेय शिक्षणात गुणवत्ता वाढावी, शिक्षणाचा दर्जा उंचवावा यासाठी शाळा 100 टक्के डिजीटल होणे गरजेचे आहे. शाळा डिजीटल होण्यासाठी यामध्ये लोकसहभाग वाढावा, असे प्रतिपादन  सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री  सुभाष देशमुख यांनी आज येथे केले. 
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील शाळेंच्या मुख्याध्यापकांची कार्यशाळा येथील निर्मलकुमार फडकुले सभागृहात संपन्न झाली, यावेळी सहाकरमंत्री सुभाष देशमुख बोलत होते. यावेळी पंचायत समिती उत्तर सभापती  श्रीमती संध्याराणी पवार, दक्षिण  सोलापूर पंचायत समितीचे  उपसभापती संदीप टेळे, गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, विस्तार अधिकारी मल्हारी बनसोडे यांच्यासह  उत्तर व दक्षिण सोलापूर मधील शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
सहकार मंत्री देशमुख म्हणाले, विद्यार्थ्यांना चांगले संस्कार शाळेत मिळतात. त्यांच्या शिक्षणाचा पाया हा प्राथमिक शिक्षणावरच अवलंबून असतो. त्यामुळे प्राथमिक - माध्यमिक शाळेतच विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण मिळणे गरजेचे आहे. मुलांना अद्ययावत व चांगले शिक्षण देण्यासाठी शाळा डिजीटल असणे आवश्यक आहे. यासाठी मुख्याध्यापकांनी आपली शाळा डिजीटल होण्यासाठी प्रयत्न करावेत. या कामी गावकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी  त्यांनी प्रयत्न करावेत, असे श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले. शाळा डिजीटल होण्यासाठी पत्येकाला शाळा माझी वाटली पाहिजे यासाठी शिक्षकांची जबाबदारी मोठी आहे असे ते म्हणाले.
श्री. देशमुख म्हणाले, चांगले विद्यार्थी घडवण्याची किमया शिक्षकांकडे असून आजचे विद्यार्थी हे उद्याच्या वैभवशाली राष्ट्राचे कर्ते आहेत. या विद्यार्थ्यांना चांगली स्वप्ने पाहण्यास व उच्च ध्येय गाठण्यासाठी शिक्षकांनी प्रवृत्त केले पाहिजे. यासाठी प्रत्येक शाळेत वेगवेगळे प्रयोग होणे आवश्यक आहे.
सोलापूर जिल्ह्यातील शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी  शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या  तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार असून त्यासाठी ‘सोलापूर फौंडेशन’ची स्थापन करण्यात येणार आहे. उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील शाळा 100 टक्के डिजीटल करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निधीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सहकारमंत्री देशमुख यांनी मुख्याध्यापकांना केल्या.
गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात शाळा सिध्दी उपक्रमाबाबत माहिती दिली. विस्तार अधिकारी मल्हारी बनसोडे यांनी आभार मानले.
*****