Monday, April 20, 2020

जगाच्या पोशिंद्याची जिल्हाधिकारी यांच्या हाकेला साद ... सोलापूर जिल्ह्यातील शेतक-यांकडून 402 क्विंटल धान्य जिल्हा प्रशासनाकडे जमा





सोलापूर दि. 20 : जगाचा पोशिंदा म्हणून ज्या शेतकऱ्याला आपण ओळखतो, त्याच मनही तेवढंच विशाल असतं... कविवर्य विठ्ठल वाघांच्याच ओळीत सांगायचं असेल तर " बाप जवारीचा धांडा..उभ्या जगाला पोसते,  आय जात्यातला दाणा पीठ होऊन हासते…भेगाळलेलं रान पुन्हा सांधून त्यातून सोनं पिकवणारा सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी कोरोना विषाणू विरूध्दच्या लढाईत आघाडीवर आहे. सोलापूर जिल्ह्यधिकारी मिलिंद शंभरकर यांनी फक्त एकदा  आवाहन केलं..अन शेतकऱ्यानी घडीच मोल जाणून तब्बल 402 क्विंटल धान्य जिल्हा प्रशासनाकडे जमा केलं.
कोरोना विषाणूच्या उपाययोजना अंतर्गत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यातील शेतक-यांना त्यांच्याकडील अतिरिक्त ज्वारीचे दान करण्याकरीता आवाहन केले होते. जिल्हा कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी याबाबत जिल्ह्यातील कृषी विभागाच्या यंत्रणेला कार्यान्वीत केले. शेतक-यांनी प्रतिसाद देवून सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यामधून 303 क्विंटल ज्वारी, 2.5 क्विंटल बाजरी, 79 क्विंटल गहू, 3 क्विंटल तूर, हरभरा डाळ तर 15 क्विंटल तांदूळ आज अखेर जमा केले.
ग्रामस्तरावर कृषी सहायक, ग्रामसेवक व तलाठी यांच्या मार्फत शेतकरी धान्य जमा करत आहेत.  हे जमा झालेले धान्य जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे जमा केले जाईल,  असे श्री. बिराजदार यांनी सांगितले.  
अकक्लकोट तालुक्यातील कृषी विभागाच्या कर्मचा-यांमार्फत 121 जीवनावश्यक वस्तूंचे कीट तयार करुन गरजू लोकांना त्याचे वाटप केले आहे असेही, श्री. बसवराज बिराजदार यांनी सांगितले आहे.

0000

No comments:

Post a Comment