Friday, April 24, 2020

कोरोना प्रतिबंधाकरीता कार्यरत सर्वच वैद्यकीय अधिकारी कर्मचा-यांना विम्याचा लाभ मिळावा केंद्रीय पथक प्रमुख संजय मल्होत्रा


  पुणे दि.24 :- कोरोना प्रतिबंधाकरिता वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणा-या सर्वच अधिकारी व कर्मचा-यांना विमा सुरक्षेचा लाभ मिळावा, असे प्रतिपादन केंद्रीय पथकातील उर्जा विभागाचे अपर सचिव संजय मल्होत्रा यांनी केले. कोरोना प्रतिबंधाकरिता करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्याकरीता केंद्रीय पथक पुणे जिल्हयाच्या दौ-यावर आले आहे. 
                  या अंतर्गत विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये पुणे जिल्हयातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणा-या वैद्यकीय संस्थां तसेच  स्वयंसेवी संस्थांचे प्रमुख यांची बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय पथकातील डॉ.पी.के.सेन, डॉ.पवन कुमार सिंग, डॉ.अरविंद अलोन, करमवीर सिंग, विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर,जिल्हाधिकारी नवल किशोर राम, अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे  उपस्थित होते.
या बैठकीमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील तसेच मेडीकल असोशिएशन,नर्सेस फेडरेशन व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी नर्सिंग विभागातील कर्मचा-यांना येणाऱ्या अडचणी, त्यांच्याकरीता आवश्यक साधनसामग्रीचा पुरवठा तसेच विलगीकरणाकरीता सोई तसेच विमा संदर्भातील अडचणींबाबत चर्चा करण्यात आली . 
              कार्यरत असणा-या  स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना व मेडीकल असोसिएशनच्या प्रतिनिधींना विम्याचा लाभ मिळण्याकरीता मागणी केली. तसेच काही जीवनावश्यक वस्तूंच्या व गॅस सिंलेंडरच्या पुरवठयाबाबत तसेच या वस्तूंच्या वितरणाच्या वेळेसंदर्भात  तसेच त्याच्या पुरवठयाबाबत सूचना करण्यात आल्या.  या सूचनांची योग्य ती दखल घेण्यात येवून शासनास तसे कळविण्यात येईल, असे श्री.मल्होत्रा यांनी सांगितले.
या प्रतिनिधींमार्फत विचारण्यात आलेल्या शंकाचे समाधान यावेळी विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
0 0 0 0

No comments:

Post a Comment