Sunday, April 26, 2020

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठीनागरिकांचे सहकार्य आवश्यक पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे नागरिकांना आवाहन


     सोलापूर दि. 26 : सोलापूर शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पोलीस प्रशासन परिश्रमपूर्वक काम करीत आहे. मात्र कोरोनाचा प्रसार आटोक्यात येण्यासाठी सोलापूर शहरवासियांचे सहकार्य आवश्यक आहे. तरी नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे केले.

          पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणू प्रसारास रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी नागरिकांना आवाहन केले.

          ते म्हणाले, शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वच प्रशासकीय यंत्रणा व्यस्त आहेत. मात्र या यंत्रणेस नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. नागरिकांनी घरातच थांबावे. अत्यावश्यक कामाशिवाय बिलकुल घराबाहेर पडू नये. आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे.

          ट्रेसिंग आणि टेस्टींग यामध्ये लक्षणिय वाढ करण्यात आली आहे. यामुळे नजीकच्या काळात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी बिलकुल घाबरुन जाऊ नये. मात्र स्वत:ची आणि कुटुंबियांची पूर्ण काळजी घ्यावी. मास्क वापरावा, शारिरीक अंतर राखावे, वैयक्तिक  स्वच्छता पाळावी, वारंवार हात धुवावे, असे त्यांनी सांगितले. 

          सोलापूर शहरातील प्रसाराची साखळी तोडण्यासाठी शहरात पूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पोलीसांनी संचारबंदी कालावधीत कठोर कारवाई केल्या आहेत. पण या कारवाई लोकांच्या हितासाठीच आहेत. त्यामुळे नागरिकांनी पोलीसांना सहकार्य करावे.  विनाकारण घराबाहेर पडून स्वत: आणि इतरांनाही धोक्यात घालू नये. याकाळात नागरिकांची कमीत कमी गैरसोय होईल याची काळजी घेतली गेली आहे. कोठे अडचण, समस्या असल्यास जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. भरणे यांनी केले.

0000

No comments:

Post a Comment