Thursday, April 23, 2020

कोरोना विरुद्धचे युद्ध जिंकण्यासाठी प्रत्येक डॉक्टरांनी सज्ज व्हावे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांचे आवाहन

    पुणे दि.२३:- कोरोना विरुद्धचे युद्ध खऱ्या अर्थाने आता सुरु झाले असून हे युद्ध जिंकण्यासाठी प्रत्येक डॉक्टरांनी सज्ज व्हावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.

  करोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध खाजगी हॉस्पिटल्सच्या प्रमुखांसोबत कौन्सिल हॉल येथे बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले. बैठकीला आरोग्य विभागाचे माजी महासंचालक तथा कोरोना नियंत्रणाचे राज्य समन्वयक डॉ. सुभाष साळुंखे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए)अध्यक्ष डॉ. आरती निमकर, आयएमए चे सचिव तथा भारती हॉस्पिटलचे डॉ. राजन संचेती, अतिदक्षता विभाग प्रमुख डॉ. अनिकेत जोशी आदी उपस्थित होते.

बैठकीत नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन, पुणे डॉक्टर्स असोसिएशन, फिजीसिएशन असोसिएशन, स्त्री रोग विशेषज्ज्ञ, कान, नाक, घसा तज्ज्ञ, ऑर्थो विशेषज्ज्ञ, ऑप्थॉल्मिक असोसिएशन आदिंच्या प्रतिनिधींकडून डॉ. म्हैसेकर यांनी अडचणी व सूचना जाणून घेतल्या व त्यावर उपाय सुचवले.

        बैठकीत डॉ. म्हैसेकर यांनी कोरोना प्रतिबंधात्मक कामातील डॉक्टर व परिचारकांच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले, रुग्णांनी लक्षणे आढळल्यास  महानगरपालिकेच्या नजिकच्या फ्ल्यू क्लिनिकमध्ये तपासणी करुन घेणे आवश्यक आहे. नागरिकांना ताप, सर्दी, घसा दुखणे, खोकला, धाप लागणे इ. लक्षणे आढळल्यास त्वरीत तपासणी करुन घेण्याबाबत खाजगी डॉक्टरांनी नागरिकांना मार्गदर्शन करावे. तपासणीसाठी आलेला व्यक्ती परजिल्हयातून प्रवास करुन आला असेल व त्याच्यात कोरोनाची लक्षणे असल्यास संबंधित रुग्णाला फ्ल्यू क्लिनिकमध्ये पाठवावे. कोणत्याही व्यक्तीला दवाखान्यात जाण्यासाठी पोलीस अडवणार नाहीत, असा विश्वास डॉ.म्हैसेकर यांनी व्यक्त केला.

 नागरिकांनी आपल्यातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी संतूलित आहार घेण्याबरोबरच घरच्याघरी व्यायाम व योगासने  करावीत. डॉक्टरांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ.म्हैसेकर यांनी केले.
 
     00000000

No comments:

Post a Comment