Friday, March 10, 2017

यशदामध्ये जलजागृती सप्ताहासंदर्भात विचार विनिमय कार्यशाळा संपन्न जलसाक्षरतेसाठी जनसहभाग महत्वपूर्ण : जलसंपदा विभागाचे उपसचिव स. को. सब्बीनवार


पुणे, दि. 4 : पाण्याचे योग्य नियोजन, सुनियोजित वापर आणि व्यवस्थापन याबाबतच्या जलसाक्षरतेसाठी जनसहभाग हाच सर्वाधिक महत्त्वपूर्ण घटक असणार आहे. त्या दृष्टीने जलसाक्षरता गावपातळीपर्यंत पोहचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जलसंपदा विभागाचे उपसचिव स. को. सब्बीनवार यांनी जलजागृती सप्ताहाच्या नियोजनासाठी आयोजित कार्यशाळेत केले.
            यशदामध्ये आयोजित या कार्यशाळेत श्री. सब्बीनवार यांनी सादरीकरणासह मार्गदर्शन केले. यावेळी पुणे विभागाचे उपायुक्त (विकास) चंद्रकांत गुडेवार, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता वि. गी. राजपूत, औरंगाबाद येथील जल व भूमि व्यवस्थापन संस्थेच्या सामाजिक शास्त्रे विद्याशाखेचे प्रमुख प्रा. डॉ. राजेश पुराणिक,  यशदाच्या जलसाक्षरता केंद्राचे (वाल्मी) संचालक आनंद पुसावळे, कार्यकारी संचालक डॉ. सुमंत पांडे आदी उपस्थित होते.
            जलसाक्षरतेसाठी इस्त्रायलचे उदाहरण आदर्श असल्याचे सांगून श्री. सब्बीनवार म्हणाले की, जलसाक्षरतेमुळेच तेथे 60 ते 70 टक्के पाण्यावर प्रकिया करुन पुनर्वापर केला जातो. जलसाक्षरतेसाठी त्या देशात मोठे अभियान राबविले जाते. आपल्या देशात पाणीसाठे निर्माण करण्याबरोबरच समांतर पद्धतीने पाण्याचा योग्य वापर कसा करावा यासाठी जनजागृतीची गरज आहे. जागतिक जलदिन 22 मार्च रोजी राबविला जातो. त्यादृष्टीने महाराष्ट्र शासनाने गतवर्षीपासून 16 ते 22 मार्च यादरम्यान जलजागृती सप्ताह राबविण्याचा निर्णय घेतला. यावर्षी यशदा येथे राज्य पातळीवरील तर चंद्रपूर येथील वन अकादमी (वनामती), औरंगाबाद येथील वाल्मी आणि अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ विकास प्रशासकीय प्रशिक्षण प्रबोधिनी येथे विभागीय पातळीवरील जलसाक्षरता केंद्रे स्थापन करण्यात आली. या माध्यमातून त्या- त्या विभागात जलसाक्षरतेचे कार्यक्रमाची रुपरेषा, प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
            श्री. सब्बीनवार पुढे म्हणाले की, गतवर्षी पाण्याशी संबंधित कृषी, पाणीपुरवठा, उद्योग, पर्यावरण, ग्रामविकास, नगरविकास अशा विभागांना लजागृती सप्ताहाच्या निमित्ताने जोडले गेले. जलसंपदा व कृषी विभागाच्या माध्यमातून किमान 10 टक्के सिंचनक्षमता वाढविणे, पाणीपुरवठा क्षेत्रामध्ये जलसाक्षरतेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्यात किमान 10 टक्के बचतीचे उद्दिष्ट साध्य करणे या बाबींना प्राधान्य देण्यात येत आहे. सिंचनक्षमता वाढविण्यासाठी पंतप्रधान सिंचन कार्यक्रमात किमान 30 टक्के क्षेत्रावर ठिबक सिंचन करण्यात येणार आहे. यापुढील काळात सिंचनाचे पाणी कालव्याद्वारे न देता बंद पाईपलाईनने देण्याबाबत नियोजन करण्यात येणार आहे.
            जलसाक्षरतेसाठी सर्व जनतेचा सहभाग घेण्यासाठी गावपातळीवर दोनशे व्यक्तींमागे एका जलसेवक निवडण्यात येणार असून जलसाक्षरतेसाठी लोकांना उद्युक्त करण्याचे काम तो करणार आहे. जलजागृती सप्ताहाचे आयोजनासाठी जिल्हा पातळीवर जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता नोडल अधिकारी म्हणून काम करणार असून सप्ताहाचे सर्व नियोजन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक धरणे असताना जलजागृतीच्या माध्यमातून पाण्याचा योग्य वापराचे महत्व लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम आपणाला करावयाचे आहे. यापुढील काळात सिंचनाच्या पाणीपट्टीची रक्कम शासनाला जमा न करता त्या रक्कमेतून त्याच धरण प्रकल्पाची दुरुस्ती व व्यवस्थापन केले जाणार आहे.
            जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन 16 मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करावयाचे असून यावेळी जलदिंडी काढून जिल्ह्यातील नद्यांचे पाणी जलकुंभात भरुन त्याचे पूजन करण्यात येणार आहे. 19 मार्च रोजी जलदौड (वॉटर रन) आयोजित करण्यात येणार आहे, याबरोबरच विविध विभागांचा सहभाग घेत कार्यक्रम राबविण्यात येणार असून 22 मार्चला जलदिनी या सप्ताहाचा समारोप करण्यात येणार आहे, असेही श्री. सब्बीरवार यांनी यावेळी सांगितले.
            डॉ. राजेश पुराणिक यांनी संगणकीय सादरीकरण करुन माहिती दिली की, जलजागृती सप्ताहानिमित्त्‍ गतवर्षी घेण्यात आलेल्या कार्यक्रमांची फलनिष्पत्ती वाल्मीकडून एका अभियानातून तपासण्यात आली. त्यात चांगले परिणाम आढळून आले. वाल्मीकडून माहिती, शिक्षण, संवाद (आयईसी) साहित्य तयार करण्यात आले. त्यामध्ये चित्रफीती, ध्वनीफीती विविध माध्यमातून प्रसारित करण्यात आल्या. यावर्षी तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी जलसंपदा विभागाबरोबच इतर विभागांचे मोठा सहभाग घेण्याची आवश्यकता असून अधिकाऱ्यांनी त्यासाठी प्रयत्न करावेत.
            ते पुढे म्हणाले की, जलसाक्षरता केवळ एका सप्ताहापुरती मर्यादित न ठेवता वर्षभर राबविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने विभागीय जलसाक्षरता केंद्राकडून प्रयत्न होणार आहेत. केवळ शासनाचे अधिकारी नव्हे तर सर्व जनता यामध्ये सहभागी होतील यादृष्टीने प्रयत्न करायचे आहेत. जलसाक्षरतेसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांना गुण पद्धतीने सन्माणित करण्यात येणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. वाल्मीने केलेल्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांनी पाणीवापर संस्था स्थापन केल्या असून त्या माध्यमातून पाणी मोजून घेण्या- देण्यासाठी मोजमाप यंत्रे बसविण्यास सुरुवात केली आहे. असेच प्रयत्न सर्वत्र व्हावेत.
            मुख्य अभियंता श्री. राजपूत म्हणाले की, आपण पाणीसाठे मोठ्या प्रमाणात निर्माण केले. मात्र, पाणीवापराची परिणामकता योग्य प्रमाणाता साधली गेली नाही. शेतीतील भाग हा समाजशास्त्राशी निगडीत असल्याने जलसंपदा विभागाचे अभियंते यात काही प्रमाणात कमी पडले. हे पाहता केवळ शेतकऱ्यांमध्ये जलसाक्षरता आणून चालणार नाही तर अभियंत्यांमध्येही जलसाक्षरता आणणे गरजेचे आहे. जलसाक्षरतेचा कार्यक्रम वर्षभर सुरु राहील यादृष्टीने प्रयत्न केल्रे जातील. शालेय विद्यार्थ्यांचा अधिकाधिक सहभाग वाढविण्यासाठी ऑक्टोबर- नोव्हेंबरपासूनच विविध उपक्रमात त्यांचा सहभाग घेतला जाईल. शालेय वयातच विद्याथ्यांवर पाणीबचतीचे संस्कार केल्यास ते आयुष्यभर पाणी जपून वापरतील, असेही श्री. राजपूत म्हणाले.
            कार्यशाळेत गटचर्चा आयोजित करुन यावर्षीच्या जलसप्ताहाच्या नियोजनासाठी विविध सूचना अधिकाऱ्यांनी सादर केल्या. त्या शेवटी श्री. सब्बीनवार यांच्याकडे लिखीत स्वरुपात देण्यात आल्या.
            प्रास्ताविकात आनंद पुसावळे यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागची भूमिका विषद केली. स्वागत आणि सूत्रसंचालन डॉ. सुमंत पांडे यांनी केले. यावेळी अभियंता आणि कवि प्रशांत आडे यांनी ‘जलसाक्षर भारत होवो’ ही उत्कृष्ट कविता सादर केली.
            कार्यशाळेस राज्यभरातून जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, गटविकास अधिकारी यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
0000



No comments:

Post a Comment