Monday, March 6, 2017

कर्तव्यदक्ष महिला.....पोलीस आयुक्त रश्मि शुक्ला!


विविध क्षेत्रे पादाक्रांत करुन महिलांनी आपला ठसा सर्वच क्षेत्रात उमटविला आहे. चौकटीबाहेरचे क्षेत्र निवडून त्यात कर्तृत्व गाजवणा-यांपैकी एक म्हणजे पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मि शुक्ला या होत महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख म्हणून काम पाहिलेल्या, भारतीय पोलीस सेवेतील त्या पहिल्या महिला अधिकारी होत. मुळच्या उत्तरप्रदेश राज्यातील लाहाबाद येथील असणा-या रश्मि शुक्ला यांनी भूगोल विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांची सन 1988 मध्ये भारतीय पोलीस सेवेत नियुक्ती झाली. त्या एक शिस्तप्रिय, निष्ठावान कर्तव्यनिष्ठ महिला अधिकारी म्हणून पोलीस दलात त्यांची ओळख आहे.
श्रीमती शुक्ला या 31 मार्च 2016 पासून पुणे पोलीस आयुक्त पदी कर्तव्य बजावत आहेत. पुणे पोलीस आयुक्त पदावर विराजमान होणा-या त्या दुस-या महिला पोलीस अधिकारी आहेत.            जळगांव, सोलापूर व मुंबई येथे कार्यरत असताना श्रीमती शुक्ला यांनी बेशिस्त रिक्षा व टॅक्सी चालकांविरुध्द कठोर कारवाई करुन वाहतुक व्यवस्थेत सुधारणा केली. महिलांसंदर्भातील व अन्य गुन्हे घडू नयेत यासाठी अशासकीय संस्थेमार्फत नागरिकांमध्ये जनजागृती उपक्रम राबवून त्याची प्रभावी अंमलबजावणी  त्यांनी केली.
            कारागृह महानिरिक्षक म्हणून काम करताना त्यांनी कैद्यांच्या कल्याणासाठी योगा, कॉम्प्युटर क्लासेस, व्होकेशनल कोर्सेस आयोजित करुन त्यांच्या मनावरील तणाव कमी करुन त्यांना सर्वसामान्य जीवन जगता येण्याकीरता तसेच कच्च्या कैदयांच्या केसेसचा निकाल लवकर होण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सींगचा उपक्रम यशस्वीपणे राबविला.
            विशेष पोलीस महानिरिक्षक (प्रशिक्षण) पदी कार्यरत असताना त्यांनी ऑनलाईन पोलीस भरती प्रक्रिया सुरु केली.  राज्य पोलीस दलातील अधिकारी कर्मचा-यांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाव्दारे पदवी पदव्युत्तर शिक्षण मिळवून देण्यात महत्वाची भुमिका पार पाडली. नोव्हेंबर 2008 च्या मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यासंदर्भातील माहिती केंद्र शासनाला सादर करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने  समन्वयक म्हणून प्रभावीपणे काम केले. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी चोख कामगिरी बजावली आहे.
            झपाटयाने वाढणा-या पुणे शहरात लाखो नागरिक राहतात. अशावेळी शहरवासीयांना संघटित गुन्हेगारी, रस्त्यांवरील मारामा-या, साखळी चारीचे प्रमाण, वाहतूक समस्या अशा विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशी परिस्थिती असताना या शहरासाठी मी काय करणार? हे मी केवळ तोंडी न सांगता माझे कामच बोलेल, असे उद्गार 31 मार्च 2016 रोजी त्यांनी पदभार स्विकारल्यानंतर व्यक्त केले होते.
पुणे पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्विकारल्यापासून त्यांनी सराईत धोकादायक गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करुन एक वर्षासाठी स्थानबध्द करुन गुन्हेगारांना राज्यातील विविध कारागृहात ठेवण्यात आले. तसेच विविध गुन्हयांतील  आरोपीं विरुध्द मोका कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली पुणे पोलीसांनी फरारी असणाऱ्या कुविख्यात गुन्हेगारी टोळीचे बापू नायर, निलेश बसवंत, सागर रजपूत यांना नवी दिल्ली व गुजरात राज्यातून पकडून जेरबंद केले आहे.
पोलीस हे घरापेक्षाही अधिक वेळ कार्यालयात आपले कर्तव्य बजावत असतात. त्यामुळे पोलीस ठाणे अथवा कार्यालय पोलीसांसाठी घरापेक्षाही महत्वाची जागा असते, असे त्या आवर्जून सांगतात. त्यांनी पुणे शहरात प्रथमच पोलीस कर्मचा-यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी  'हितगुज' हा उपक्रम 7 नोव्हेंबर 2016 पासून सुरु केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी केवळ तीन महिन्यात 550पेक्षा अधिक पोलीस कर्मचा-यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांचे निरसन केले आहे.
 राज्यात महिलांना निर्भय आणि सुरक्षित  वातावरण निर्माण करुन देणे हे पोलीस प्रशासनाचे कर्तव्य आहे, असे त्या मानतात. हे केवळ त्यांचे विचार नाहीत तर हे सर्व त्या आपल्या कृतीतून दाखवून देतात.आयटीयन्स आणि महिलांना तत्काळ पोलीस मदत मिळण्यासाठी बडी कॉप हे अॅप्लीकेशन पोलीस आयुक्त कार्यालयात सुरू केले आहे. सेवा बजावण्यासाठी तत्पर असताना पोलीस ठाणे आणि पोलीस चौकीत आलेल्या नागरिकांना पोलीसांनी सौजन्यपूर्ण वागणूक द्यावी असे त्या आवर्जून सांगतात. त्यांनी रुजू झाल्यापासून आजवर केवळ नऊ महिन्यात  सुमारे 2 हजार  सर्वसामान्य नागरिकांची भेट घेऊन, त्यांच्या तक्रारींचे निरसन केले.
स्वत:चा मोबाईल क्रमांक जाहिर करुन नागरिकांना त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी उपलब्ध करुन देणा-या त्या पहिल्या महिला पोलीस आयुक्त आहेत. त्यांच्या कार्यपध्दतीतून त्यांनी सामान्यांप्रती असणारी आत्मियता दाखवून दिली आहे. पारपत्र व चारित्र्य पडताळणी करण्यासाठी कर्मचा-यांना टॅबलेट उपलब्ध करुन दिल्यामुळे संबधीत कर्मचारी अर्जदाराच्या घरी जाऊन पासपोर्टसाठी चारित्र्य पडताळणी करु शकत आहेत.   यामुळे नागरिकांची सोय झाली असून हे  काम अधिक जलदपणे होत आहे. श्रीमती शुक्ला यांनी पुणे शहरात प्रथमच ज्येष्ठ नागरिकांसाठी  1090 ही हेल्पलाईन (24X7) सुरु केली असून स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक कक्ष लवकरच पोलीस आयुक्तालयात सुरु करण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.
श्रीमती रश्मि शुक्ला यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे, त्यांना सन 2004 मध्ये पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह तसेच मा. राष्ट्रपती, भारत सरकार यांनी सन 2005 मध्ये गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक व सन 2013 मध्ये प्रशंसनिय सेवेबद्दल पोलीस पदक देवून गौरविले आहे. रश्मि शुक्ला यांच्यासारख्या महिला अधिकारी पोलीस दल आणि सर्वसामान्यांसाठी आदर्शवत आहेत हे निश्चितच !

--श्रीमती वृषाली पाटील
प्र.जिल्हा माहिती अधिकारी, पुणे

No comments:

Post a Comment