Tuesday, March 7, 2017

स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी १६ मार्च पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन



पुणे, दि. ७ (विमाका): अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेंतर्गत  लाभ देण्यात येणार आहे. या योजेनेचा लाभ घेण्यासाठी दिनांक १६ मार्च २०१७ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त, के.एम. आढे यांनी केले आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केलेली आहे. या योजनेसाठी विद्यार्थ्यांना दहावी, बारावी, पदवी, पदविका परीक्षेमध्ये ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा ५० टक्क्यांपर्यंत शिथिल करण्यात आली आहे.
            या योजनेंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेण्यासाठी शासकीय वसतिगृहात प्रवेशित नसणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी पुढीलप्रमाणे रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वितरीत करण्यात येईल.
पुणे या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता:३२ हजार रुपये, निवास भत्ता: २० हजार रुपये तर निर्वाह भत्ता ८ हजार रुपये अनुज्ञेय राहील. इतर महसूल विभागीय शहरातील व उर्वरित 'क' वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता:२८ हजार रुपये, निवास भत्ता: १५ हजार रुपये तर निर्वाह भत्ता ८ हजार  रुपये अनुज्ञेय राहील. उर्वरित ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता:२५ हजार रुपये, निवास भत्ता: १२ हजार रुपये तर निर्वाह भत्ता ६ हजार रुपये अनुज्ञेय राहील. उपरोक्त रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष ५ हजार रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष २ हजार रुपये एवढी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरूपात देण्यात येईल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठीचे निकष, अटी व शर्ती व अर्ज https://www.maharashtra.gov.in/https://www.mahaeschol.maharashtra.gov.in/https://sjsa.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ज्या जिल्ह्यातून जातीचे प्रमाणपत्र काढलेले आहे त्या जिल्ह्यात सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण कार्यालयामध्ये समक्ष, टपालाद्वारे किंवा कार्यालयाच्या ईमेल पत्त्यावर दिनांक १६ मार्च २०१७ पर्यंत अर्ज दाखल करावा. अत्सेच अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण, पुणे विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.
******




No comments:

Post a Comment