Wednesday, October 4, 2017

बालगंधर्व रंगमंदिर येथे मुद्रा प्रोत्साहन अभियानाचे आयोजन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत -राजेंद्र मुठे


            पुणेदि. 3: "मुद्रा प्रोत्साहन अभियानामध्ये" जिल्हयातील तरुणांचा सहभाग महत्वाचा असून  हे अभियान यशस्वीहोण्यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी आज येथे केले.
            कॅशलेस इंडिया या मोहिमे अंतर्गत "मुद्रा प्रोत्साहन अभियान" हा कार्यक्रम पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर येथे 16 ऑक्टोबर 2017 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना श्री. मुठे बोलत होते.
             या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दिनेश डोके, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दिनकर देशमुख, प्रांताधिकारी भाऊसाहेब गलांडे, प्रांताधिकारी ज्योती कदम, जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार, जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी शहाजी पवार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक के.जी.डेकाटे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या सहायक संचालक अनुपमा पवार आदि उपस्थित होते.
            श्री. मुठे म्हणाले, देशात कॅशलेस इंडिया मोहिम राबविण्यावर भर देण्यात येत आहे. विविध शासकीय योजना राबविताना अधिकारी व कर्मचाऱ्यांबरोबरच तरुणांनीही डिजीटल व्यवहाराला प्रोत्साहन द्यावे, यासाठी पुण्यातील "मुद्रा प्रोत्साहन अभियान" या कार्यक्रमातही कॅशलेस व्यवहारावर भर देण्यात येणार आहे. राज्यात केवळ मुंबई, नागपूर व पुणे अशा तीनच ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
            जिल्हा अग्रणी बँकेचे श्री. देशमुख म्हणाले, मुद्रा प्रोत्साहन अभियानात मुद्रा बँक योजनेची माहिती देण्याबरोबरच लाभार्थ्यांच्या यशकथांचा माहितीपटही दाखविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याठिकाणी विविध  बँकांचे, विविध शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉल्स, बचत गट वस्तू विक्री, आधार कार्ड बँक खात्याला लिंक करणे, खाद्य पदार्थ विक्री, विविध कंपन्यांचे स्टॉल्सही लावण्यात येणार असून याद्वारे डिजीटल पेमेंटचा प्रसार करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले या बैठकीला विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
0000

No comments:

Post a Comment