Monday, October 9, 2017

तीन वर्षपूर्ती निमित्त “संकल्प ते सिध्दी” या लोकराज्‍य विशेषांकाचे प्रकाशन


पुणे दि. 9: महाराष्ट्र शासनाच्या तीन वर्षपूर्तीनिमित्त माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने निर्मिती करण्यात आलेल्या संकल्प ते सिध्दी या लोकराज्यच्या आक्टोबर महिन्याच्या विशेषांकाचे प्रकाशन विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते आज स्थानिकस्तरावर त्यांच्या दालनात करण्यात आले.
            यावेळी पुणे विभागीय कार्यालयाचे उपसंचालक (माहिती) मोहन राठोड, पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, सोलापूरचे जिल्हा माहिती अधिकारी रविंद्र राऊत, साताऱ्याचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील उपस्थित होते.
            यावेळी चंद्रकांत दळवी म्हणाले, लोकराज्यचा प्रत्येक अंक हा दर्जेदार आणि संग्राह्य असतो. नेहमी प्रमाणे आक्टोबर महिन्याचा संकल्प ते सिध्दी हा विशेषांकही दर्जेदार झाला आहे. पुणे विभागात अधिकाधिक लोकांपर्यंत लोकराज्य जावा यासाठी सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बैठक घेवून लोकराज्य वर्गणीदार वाढीची मोहिम राबविण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संकल्प ते सिध्दी हा नारा दिला आहे. सन 2022 पर्यंत अस्वच्छता, दारिद्र्यमुक्त, भ्रष्टाचारमुक्त, आतंकवादमुक्त, जातवाद आणि संप्रदायमुक्त देश करण्याचे ध्येय ठेवले आहे. यासाठी त्यांनी पाच वर्षाचा कालावधी निर्धारित केला आहे. प्रधानमंत्र्यांच्या संकल्प ते सिध्दी या महत्वकांक्षी भारताच्या नवनिर्माण कार्यक्रमात महाराष्ट्राचे योगदान या विषयाचे प्रतिबिंब या लोकराज्यच्या आक्टोबर महिन्याच्या अंकात देण्यात आले आहे. त्याचबरोबर 30 आक्टोबर रोजी महाराष्ट्र शासनाला तीन वर्षपूर्ण होत असल्याचे औचित्यही या निमित्त साध्य करण्यात आले आहे. या अंकात चले जावआंदोलनाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा गोषवारा देण्यात आला आहे. तसेच उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील सर्व मंत्री महोदयांच्या लेखांचा समावेश करण्यात आला आहे.

लोकराज्यचा संकल्प ते सिध्दी हा आक्टोबर महिन्याचा अंक सर्व ठिकाणच्या वृत्तपत्र विक्रेत्यांकडे विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment