Wednesday, October 25, 2017

भ्रष्टाचार विरोधी जनजागृती सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन


          पुणे दि.२५ : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दि. ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०१७ या कालावधीत 'भ्रष्टाचार विरोधी दक्षता जनजागृती सप्ताह' आयोजीत करण्यात आला आहे. भ्रष्टाचार विरोधात जनजागृती करण्यासाठी या सप्ताहात विविध कार्यक्रम आयोजित करण्यातयेणार आहेत, अशी माहिती प्र. जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी दिली.
          'भ्रष्टाचार विरोधी जनजागृती सप्ताह' आयोजनाबाबत श्री. काळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली, यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रसाद हसबनीस, पोलीस उप अधीक्षक जगदीश सातव तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
           केंद्रीय दक्षता आयोगाच्या निर्देशानुसार दरवर्षी 'भ्रष्टाचार विरोधी जनजागृती सप्ताह' देशभरात सर्व शासकीय कार्यालयात आयोजित केला जातो. या माध्यमातून नागरिकांमध्ये भ्रष्टाचार विरोधी जनजागृती करण्यात येते. सोमवार पासून सुरु होणाऱ्या या सप्ताहात याविषयीच्या जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
 'समाजाचा विकास व भ्रष्टाचार, भ्रष्टाचार प्रतिबंध करण्यासाठीच्या उपाययोजना, भ्रष्टाचार प्रतिबंध संदर्भात मी काय करु शकतो?, भ्रष्टाचार समाजाला लागलेली एक कीड, भ्रष्टाचार संपवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, भ्रष्टाचारमुक्त भारत माझे स्वप्न' या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.
          शहरातही सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ देऊन सप्ताहाला सुरुवात करण्यात येईल. या सप्ताहामध्ये शहर व जिल्ह्य़ातील सर्व शाळामहाविद्यालये, सहकारी गृहनिर्माण सोसायटी, सरकारी रुग्णालये तसेच मोक्याच्या ठिकाणी भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृतीसाठी फलकस्टीकर्स लावण्यात येणार आहेत. तालुका व गाव पातळीवर देखील भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती करण्याचे नियोजन लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्यात येत आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या श्री. हसबनीस यांनी दिली. 
०००००००

No comments:

Post a Comment