Wednesday, October 18, 2017

पुणे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप कर्जमाफी तर सुरूवात शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हेच शासनाचे अंतिम उद्दिष्ट - पालकमंत्री गिरीश बापट


Ø  जिल्ह्यातील 25 पात्र शेतकऱ्यांचा प्रातिनिधीक सन्मान.
Ø  जिल्ह्यात एकूण 2 लाख 98 हजार 56 लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती अपलोड.
Ø  जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अंदाजे साडे पाचशे कोटींचा मिळणार लाभ.
पुणे दि. 18: बळीराजा हा आपल्या सर्वांचा पोशिंदा आहे. या पोशिंद्याच्या मागे सरकार ठामपणे उभे आहे. आजचा दिवस राज्याच्या दृष्टीने ऐतिहासिक असून कर्जमाफी ही तर केवळ सुरुवात असून राज्यातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हेच शासनाचे अंतिम उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज केले.
            येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मुख्य सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रमात जिल्ह्यातील प्रातिनिधीक स्वरुपात पात्र 25 शेतकऱ्यांचा कर्जमाफी प्रमाणपत्र, सन्मानपत्र, साडीचोळी, दिवाळी फराळ देवून पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव, आमदार बाबुराव पाचर्णे, आमदार जगदीश मुळीक, पुणे बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे, विभागीय सहनिबंधक दीपक तावरे, जिल्हा उपनिबंधक आनंद कटके उपस्थित होते.
            श्री. गिरीश बापट म्हणाले, राज्यातील शेतकरी निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकला आहे. या दुष्टचक्रामुळे त्याच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. शेतकरी आपला सर्वांचा पोशिंदा असल्याने त्याला या संकटातून बाहेर काढण्याची आपली जबाबदारी आहे. आजचा दिवस हा राज्याच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस आहे. कर्जमाफी ही तर सुरूवात असून राज्यातील शेतकऱ्याला संपुर्ण कर्जमुक्ती द्यायची आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने सरकारची कार्यवाही सुरु असून शेतकऱ्यांना शेतीच्या बरोबर शेतीपुरक उद्योग उभारण्यासाठी सरकार मदत करत आहे. त्यासाठी सर्वंकश आराखडा तयार करण्याचे काम राज्य शासनाने हाती घेतले आहे.  
            राज्यातील शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यावर शासनाचा भर राहणार आहे. त्यासाठी शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना करुन देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. जलयुक्त शिवार अभियानाचे चांगले परिणाम राज्यभर दिसत आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक गावे टँकरमुक्त झाली आहेत. पुणे जिल्ह्यातून एकूण 2 लाख 98 हजार 56 लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्याचे काम पूर्ण झाले आहे. या  योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अंदाजे साडे पाचशे कोटी रुपयांचा फायदा होणार आहे. या योजनची ही सुरूवात आहे, त्यामुळे या यादीत कोणाचे नाव नसेल तरी तो पात्र असेल तर त्याला त्याचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री महोदयांनी जाहिर केल्या प्रमाणे राज्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे.
            चंद्रकांत दळवी म्हणाले, राज्य शासनाने जाहीर केलेला कर्ज माफीचा निर्णय हा अत्यंत महत्वाचा आणि ऐतिहासिक आहे. यापूर्वी करण्यात आलेल्या कर्जमाफीमध्ये केंद्र सरकारने योगदान दिले होते. मात्र यावेळची कर्जमाफी ही संपुर्णपणे राज्य शासनाने केलेली आहे. या नवीन धोरणामुळे राज्यातील अपात्र लोकांना याचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे खऱ्या आणि योग्य लाभार्थ्यापर्यंत या योजनेचा लाभ जाणार आहे. राज्याने जाहीर केलेली 34 हजार कोटींची कर्जमाफी ही अत्यंत मोठी आहे. राज्य शासनाने हा निर्णय अत्यंत कमी वेळेत घेतला आहे. कर्जमाफीमध्ये गैरप्रकार होवू नये यासाठी शासनाने योग्य खबरदारी घेतली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे शेतकऱ्यांवरील मोठा बोजा कमी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपनिबंधक आनंद कटके यांनी केले तर आभार विभागीय सहनिबंधक दीपक तावरे यांनी मानले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातून विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुरू असणाऱ्या कर्जमाफी प्रारंभ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मोठ्या पडद्यावर दाखविण्यात आले.
*****
पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रीया
आमच्या आयुष्याला नवी उभारी मिळेल
शासनाने केलेल्या कर्जमाफीमुळे डोक्यावरचा मोठा बोजा कमी झाला आहे. निसर्गाचा कोप झालेला असताना शासनाने दिलेला मदतीचा हात आम्हाला नक्कीच मदतीला येणार आहे. यामुळे आमच्या आयुष्याला नवी उभारी मिळेल. या कर्जमाफी बद्दल आम्ही शासनाचे मन:पूर्वक आभार मानतो.
-    शशीकांत रंगनाथ गोटे – झगडेवाडी, ता. इंदापूर .
डोक्यावरचा बोजा उतरला
गेल्या काही वर्षापासून निसर्गाच्या बदललेल्या चक्रामुळे आम्ही अडचणीत आलो होतो. त्यामुळे कुटुंब चालविताना मोठी दमछाक होत होती. निसर्गाच्या कोपामुळे उत्पन्नात मोठी तुट झाली होती, त्यामुळं डोक्यावर मोठा कर्जाचा बोजा वाढला होता. या कर्जमाफीमुळं डोक्यावरचा बोजा उतरला आहे.  
-    शमशुद्दीन नबीराज शेख  – कडबनवाडी  ता. इंदापूर
आता नव्या दमाने कामाला लागणार
डोक्यावर कर्जाचा बोजा असल्यामुळे दुसऱ्या बँका कर्जासाठी दारात उभ्या करत नव्हत्या. त्यामुळं सगळच ठप्प झाल होतं. आता या कर्जमाफीमुळं डोक्यावरचा कर्जाचा बोजा तर उतलाच आहे. आता थकीत नसल्यामुळे पुढच्या हंगामासाठी बँकाही कर्ज देतील. त्यामुळं आता नव्या दमानं कामाला लागणार आहे.  
-    शमशुद्दीन नबीराज शेख  – कडबनवाडी  ता. इंदापूर
*****






No comments:

Post a Comment