Wednesday, October 4, 2017

गतिमान प्रशासनाचा झिरो पेंडन्सी पाया विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी : जिल्हा परिषदेच्या अभिलेख कक्षाचे उद्घाटन


सोलापूर दि. 4 : शासकीय कार्यालयात  काम घेऊन येणारे सामान्य नागरीक, जनतेच्या चेहऱ्यावर समाधान दिसावे यासाठी सर्व यंत्रणांनी काम करणे आवश्यक आहे. सामान्य माणसाला तत्पर सेवा देण्यासाठी पुणे विभागात  झिरो पेंडन्सी उपक्रम राबविला जात आहे. झिरो पेंडन्सी  उपक्रम गतीमान प्रशासन आणि तत्पर सेवेचा भक्कम पाया असल्याचे मत पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी आज येथे व्यक्त केले.
            सोलापूर जिल्हा परिषदेच्या नुतनीकरण केलेल्या अभिलेख गृहाचे उद्घाटन विभागीय आयुक्त श्री. दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद येथे आयोजित कार्यक्रमात अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करतान ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पोपटराव बनसोडे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे सभापती, सदस्य व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
            विभागीय आयुक्त  दळवी म्हणाले, सोलापूर जिल्हा परिषदेने अभिलेख  वर्गीकरणाच्या कामात कल्पकतेचा वापर करुन  झिरो पेंडन्सी उपक्रमात उत्कृष्ट काम केले आहे. त्यांच्याकडे असलेल्या अभिलेख्यांची उत्तमरित्या वर्गवारी झाल्याने प्रलंबित कामाचा निपटारा जलद गतीने होण्यास मदत होणार आहे.  कोणत्याही पाठपुराव्याशिवाय जनतेची कामे करण्यात कर्मचाऱ्यांनी यापुढे काम करणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडील प्रलंबित कामे यांची माहिती मिळाल्यामुळे ही कामे गतीने पूर्ण होऊन सामान्य माणसाला तत्पर सेवा मिळण्यास आता अडचण येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. सोलापूर जिल्हा परिषदेने झिरो पेंडन्सीमध्ये केलेले काम कौतुकास्पद असून ते राज्याला मार्गदर्शक आहे.
            जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे 30 सप्टेंबर 2017 पर्यंत असलेल्या सर्व प्रलंबित प्रकरणाचा निपटारा  दोन महिन्यात पूर्ण करण्यासाठी प्राधान्य द्यावे.  सोलापूर जिल्हा डिसेंबर 2017 पर्यंत हागणदारी मुक्त करण्यासाठी आता पुढाकार घ्यावा. तसेच पंतप्रधान आवास योजनेमध्ये उत्कृष्ट काम करुन जिल्ह्याच्या लौकिकात भर टाकावी, अशा सूचना विभागीय आयुक्त दळवी यांनी दिल्या.
            श्री. दळवी म्हणाले, ‘पुणे विभागात राबविण्यात येत असलेला झिरो पेंडन्सी उपक्रम  नगरपालिकेमध्ये सुरु करण्यात आला असून हा उपक्रम आता ग्रामपंचायतस्तरावरही राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय ते मंडलस्तर तसेच जिल्हा परिषद ते ग्रामपंचायत पर्यंत हा उपक्रम राबवून सामान्य माणसाला तत्पर सेवा देण्यासाठी  पुढील काळात काम केले जाईल’.
            यावेळी जिल्हा  परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी   डॉ. राजेंद्र भारुड यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी-कर्मचारी यांनी मनोगत व्यक्त केले.
*****



No comments:

Post a Comment