Saturday, June 27, 2020

कोविड-19 किंवा तत्सम आजारासंबंधी तात्काळ उपचारासाठी आवश्यक साधनसामुग्री सुसज्जजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतला

तळेगाव दाभाडे येथील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा
पुणे दि.27 : -  कोविड-19 किंवा तत्सम आजारासंबंधी तात्काळ उपचारासाठी सर्व आवश्यक साधनसामुग्री सुसज्ज करण्यात येत आहे. भविष्यात कुठलीही आपत्ती उद्भवल्यास तात्काळ उपचाराची सुविधा उपलब्ध असण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने कार्यवाही करावी, निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दिले. कोरोनावर संपूर्णपणे मात करण्यासाठी नियम पाळले गेले पाहिजेत. नियमभंग करणा-यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचेळी त्यांनी स्पष्ट केले.
         तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या सभागृहात जिल्हाधिकारी राम यांनी  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे  शहराचा आढावा घेतला. यावेळी आमदार सुनील शेळके, उप विभागीय अधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार मधुसूदन बर्गे, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंझाड, लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन पवार आदींसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
      जिल्हाधिकारी राम म्हणाले, अर्थव्यवस्थेत सुधारणांच्या दृष्टीने काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. उद्योग- व्यवसायांना परवानगी दिली. पण याचा अर्थ कोरोनाचे संकट टळले असे नाही. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग व इतर दक्षतेचे पालन झालेच पाहिजे. त्यासाठी महसूल, नगरपालिका, पोलीस व इतर सर्व यंत्रणांनी  कोणत्याही परिस्थितीत नियमपालनाच्या दृष्टीने कडक अंमलबजावणी केली पाहिजे. असे निर्देश त्यांनी दिले.
       जिल्हाधिकारी राम म्हणाले , लोणावळा परिसरात रुग्णसंख्या कमी आहे, म्हणून निष्काळजी राहून चालणार नाही तर पुढील संभाव्य धोका विचारात घेता वैद्यकीय सुविधांची उभारणी करावी असे सांगून तळेगाव येथे मुंबई, पुण्यासह बाहेरगावावरून येणारांची संख्या विचारात घेता संस्थात्मक क्वारंटाईन सुविधा वाढवावी तसेच या क्वारंटाईन सेंटरला चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्यावर भर द्यावा,  बाहेरील नागरिकांच्या विलगीकरणासंदर्भात सूचना करुन  कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जनजागृती करण्यात यावी. असे सांगितले.
टाळेबंदीतील शिथिलीकरणानंतर यंत्रणांची जबाबदारी वाढली असल्याचे सांगून जिल्हाधिकारी राम म्हणाले, सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे आदींचा अवलंब होत नसल्यास कारवाई करून शिस्त निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा. कोणत्याही परिस्थितीत कंटेनमेंट झोन्समध्ये कडक बंधने पाळली जातील, याकडे लक्ष द्यावे. मायक्रो कंटेनमेंट झोनवर भर देण्यात यावा तसेच कोरोनाची साखळी तोडणे हे आपल्यापुढील प्राधान्याचे आव्हान आहे. ती सजगता ठेवून कामे करावीत. जिथे उद्योग- व्यवसायांना परवानगी देण्यात आली तिथे लक्ष केंद्रित करून अधिक काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच तळेगाव दाभाडे व लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने दररोज कोरोना विषयक जनजागृतीसाठी शहरातून वाहनाव्दारे जनजागृती करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी राम यांनी दिले.
  आमदार  सुनिल शेळके यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय सुविधांमध्ये वाढ करावी, असे सांगितले.
  उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांनी कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
जिल्हाधिकारी राम यांनी तळेगाव दाभाडे येथे राव कॉलनी येथील मायक्रो कंटेनमेंट झोन, कोवीड केअर सेंटर तसेच शहरालगतच्या तलावाची पाहणी केली. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment