Monday, June 29, 2020

गृहमंत्र्यांनी केला पोलीस कर्मचाऱ्यांसह, मदत करणाऱ्या व्यक्तींचा, संस्थांचा सत्कार



सातारा दि. 29 (जि. मा. का): जिल्ह्यात कोरोनाच्या लढाईमध्ये पोलिस दलाने अत्यंत चांगले आणि कौतुकास्पद काम केले. याचा मला सार्थ अभिमान आहे. पोलिसांच्या सहकार्याला धावून आलेल्या जनतेचाही मी आभार मानतो, अशा शब्दात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोरोना लढ्यात मोलाचे योगदान देणाऱ्या   यौद्याचे मनोबल उंचावले. 
लॉकडाउनच्या काळात प्रभावी काम करणारे पोलिस अधिकारी व कर्मचारी, तसेच पोलिसांना व गरजू नागरिकांना मदत करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा आज अलंकार हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात गृहमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त अधीक्षक धीरज पाटील, उद्योजक फरोख कूपर आदी उपस्थित होते. 
यावेळी बोलताना गृहमंत्री श्री. देशमुख पुढे म्हणाले, कोरोनाच्या लढाईमध्ये पोलिस दलाने मोलाची कामगिरी केली असून  यात अनेक पोलीसांना संसर्ग झाला. त्यात काहीजण मृत्युमुखी पडले, तरीही पोलिस दल धैर्याने या संकटाशी मुकाबला करत आहे.  पोलीस दलासाठी राज्य सरकार खंबीर आहे. कोरोनाच्या काळात सातारा जिल्ह्यातही चांगले काम झाले आहे. '' 
जिल्हा पोलिसांनी अधीक्षक सातपुते यांच्या नेतृत्वाखाली तेजस्वी कामगिरी केल्याचे खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, आमदार शशिकांत शिंदे यांनीही पोलिस अधीक्षक सातपुते यांच्या नेतृत्वाखाली पोलिस दलाने केलेल्या कामामुळे जिल्ह्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात राहण्यास मदत झाल्याचे सांगितले. पोलिस दलाला आमदार निधीतून पाच लाख रुपये दिल्याचे सांगतानाच रेनकोटही वाटप करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 
या वेळी पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील, उपनिरीक्षक गणेश वाघ, हवालदार नीलेश दयाळ, सागर गोगावले, अश्विनी माने यांचा प्रातिनिधिक स्वरुपात सत्कार करण्यात आला. जिल्ह्याच्या सीमांवर असलेल्या तपासणी नाक्यावर काम करणाऱ्या पथकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. 
पोलिस दलाच्या आवाहनांवर मदतीसाठी पुढे येणाऱ्यांपैकी उद्योजक फरोख कूपर, अक्षय भोसले, वैभव कदम, प्रसाद कुलकर्णी, मंदार कलेढोणकर, डॉ. प्रियांजली वाळवेकर, डॉ. जवाहरलाल शहा, सुजित जगधणे, सलिम मुजावर, ऍड. जनार्दन बोथरे, महेंद्र सचदेव, पोलिस मित्र कुणाल मोरे, शुभम भोसले, विजय लिंगाडे, संध्या पवार, सुनील वेल्हाळ, गुणवंतराव जाधव, मेघनाथ बल्लाळ, रस्ता सुरक्षा दलाचे उपमहासमादेशक उमेश देशमुख, यशवंत गायकवाड, चंद्रकांत साळुंखे, रवी यादव आदींचा सत्कार करण्यात आला. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले तर धीरज देशमुख यांनी आभार मानले. 
यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस दलाचे सागरिका कॅंटीन व पोलिस वसाहतीच्या कामाची पाहणी केली. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दालनाची व त्यातील दरपत्रकांची त्यांनी आवर्जून माहिती घेतली. संपूर्ण राज्यात हा उपक्रम राबविण्याचा मानसही श्री. देशमुख यावेळी व्यक्त केला. 

000

No comments:

Post a Comment