Saturday, June 27, 2020

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जाणून घेतल्या ग्रामस्तरावरील समस्या



आरोग्यसेविका, आशासेविकांना सर्वेक्षणाबाबत केल्या सूचना

सोलापूर, दि.27: जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पानगाव (ता. बार्शी) ग्रामपंचायतीला भेट देऊन ग्रामस्तरावरील समस्या जाणून घेऊन उपाययोजना सूचवल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुका वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका, आशासेविका यांना गावातील सर्वेक्षणाबाबत विविध सूचना दिल्या.

श्री. शंभरकर हे आज पानगाव दौऱ्यावर होते. दौऱ्यादरम्यान त्यांनी ग्रामपंचायतीला भेट दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, तहसीलदार प्रदीप शेलार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष जोगदंड, सरपंच सखुबाई गुजले, मंडल अधिकारी शरद शिंदे, तलाठी सचिन गोडगे, ग्रामविकास अधिकारी भागवत भोसले यांच्यासह आरोग्यसेविका, आशासेविका उपस्थित होत्या.

गावातील कोरोनाबाबत कुटुंब सर्वेक्षण करताना पल्स ऑक्सिमीटर आणि थर्मल गनचा वापर करा. याच्या वापरानंतर ते सॅनिटायझरने निर्जंतुकीकरण करा. वयोवृद्ध, रक्तदाब, हृदयरोग, कॅन्सर, दमा, शुगर असे आजारी असणाऱ्या रूग्णांची काळजी घ्या. त्यांच्यावर लक्ष ठेवा. सर्वेक्षणानंतर या रूग्णांना किमान आठवड्यातून दोनदा भेटी देऊन माहिती घ्या. आरोग्य कर्मचाऱ्यांनीही मास्क आणि ग्लोजचा वापर करूनच सर्वेक्षण करा, गंभीर रूग्णांना तत्काळ रूग्णालयात पाठविण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

गावची लोकसंख्या सर्वेक्षणानुसार 5907 असून 1127 कोमॉर्बिड रूग्ण आहेत. 10 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. 789 हे 60 वर्षांवरील तर 338 रूग्ण इतर आजाराचे असल्याची माहिती डॉ. जोगदंड यांनी दिली. ग्रामपंचायतीमार्फत रूग्णांना अर्सेनिक गोळ्या देण्याची तयारी करण्यात आल्याची माहिती श्री. भोसले यांनी दिली.   

गावात कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यासाठी तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी यांनी प्रयत्न करावेत. कर्जमाफी झालेल्यांची यादी बँकेला देऊन त्यांना पीक कर्ज देण्याच्या सूचना करा, असेही श्री. शंभरकर यांनी सांगितले.

खरिपाचे क्षेत्र 2200 हेक्टर असून 60 टक्के सोयाबीन, तूर पिकाची पेरणी झाल्याचे तलाठी श्री. गोडगे यांनी सांगितले.

श्री. शंभरकर यांनी गावातील सर्वेक्षण कसे चालते? घरकुले किती जणांना दिली? पेरणी किती झाली?, खतांबाबत शेतकऱ्यांच्या काही तक्रारी आहेत का? याबाबतही माहिती घेवून मार्गदर्शक सूचना दिल्या.

No comments:

Post a Comment