Thursday, June 25, 2020

महामार्गाची कामे गतीने करापालकमंत्री भरणे यांच्या सूचना


सोलापूर, दि.25: सोलापूर जिल्ह्यातून मराठवाडा, कर्नाटक, कोकण यांना जोडणारे महामार्ग जातात. वन, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य रस्ते विकास महामंडळ व संबंधित महसूल अधिकाऱ्यांनी शिल्लक असलेली भूसंपादनाची कामे मार्गी लावून शहराला जोडणाऱ्या महामार्गांची कामे गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
 
जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय महामार्गाच्या आढावा बैठकीत श्री. भरणे यांनी सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, भारतीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता संजीव कुलकर्णी, राज्य रस्ते महामंडळाचे कार्यकारी अभियंता अजय भोसले यांच्यासह भूसंपादन अधिकारी, प्रांत उपस्थित होते.
 
श्री. भरणे म्हणाले, पालखी मार्गाच्या कामांसोबत इतर महामार्गाची कामे त्वरित होणे गरजेचे आहे. वन विभागांशी महसूल, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन कालबद्ध कार्यक्रम तयार करावा. रस्त्यासाठी उत्खनन करताना शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाहीत, याबाबत काळजी घ्यावी.
 
यावेळी उपवन संरक्षक पी.एच. बडगे यांनी वन विभागाच्या अडचणी मांडल्या, त्यावर इतर जिल्ह्यात वापरलेली पद्धत इथेही वापरा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
 
जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून चौपदरी तर सार्वजनिक बांधकाम आणि राज्य रस्ते विकास महामंडळाकडून दुपदरी रस्त्यांच्या 21 प्रकल्पांचे काम सुरू आहे. यात  61 हजार 459 जमीन मालक बाधित झाले असून त्यांना नियमानुसार भरपाईची रक्कम देण्याचे काम गतीने सुरू असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी दिली. 


                                                       000000

No comments:

Post a Comment