Wednesday, June 10, 2020

खरीप हंगाम पूर्व कामे गतीने पूर्ण करावीत कोरोना परिस्थिती, खरीप हंगाम व मान्सून पूर्व कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा



पुणे, दि.10: जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दौंड तहसील कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी दौंड तालुक्यातील कोरोना परिस्थिती, खरीप हंगाम व मान्सून पुर्व कामांचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

     यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, पोलीस उप अधीक्षक ऐश्वर्या शर्मा, उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार संजय पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे व अन्य संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले, कोरोना परिस्थितीत काम करताना अडचण येवू नये, तसेच रुग्णांना वेळेत उपचार मिळवून देण्यासाठी सुयोग्य नियोजन करा. मनुष्यबळासह रुग्णवाहिका सुसज्ज ठेवा. रुग्णालयात पुरेसा औषधासाठा व आवश्यक वैद्यकीय उपकरणे असल्याची माहिती वेळोवेळी घ्या. संस्थात्मक विलगीकरण केलेल्या ठिकाणी साफसफाई वर भर द्या, तसेच येथील नागरिकांना सकस आहार देण्यात यावा, असे त्यांनी आवर्जून सांगितले.  महसूल, आरोग्य व संबंधित अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय साधून कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत, यासाठी निर्धार करा, असे सांगून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना तालुक्यांनी जिल्हा प्रशासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावांना तात्काळ मंजुरी दिली जाईल, असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले, खरीप हंगाम पूर्व कामे गतीने पूर्ण करावीत. शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर खते व बियाणे उपलब्ध करुन द्यावेत. सोयाबीनचे बियाणे घरगुती वापरण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे सांगून निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबतचा त्यांनी आढावा घेतला.

श्री. राम म्हणाले, मान्सून पूर्व कामे गतीने पूर्ण करावीत. बांधकामाच्या पडझडीमुळे कोठेही दुर्घटना घडू नये, यासाठी समिती स्थापन करून इमारती, संरक्षक भिंतींच्या देखभालीची माहिती घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड व तहसीलदार संजय पाटील यांनी विविध उपाययोजनांबाबतची माहिती दिली.

0000000

No comments:

Post a Comment