Monday, July 27, 2020

खरीप हंगामाकरीता प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी 31 जुलै पर्यंत सहभागी होण्याचे आवाहन-जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पडघलमल


पुणे, दि. 27: प्रधानमंत्री पीक विमा योजना २०२०-२१ या खरीप हंगामापासून राज्यात तीन वर्षाकरीता राबविण्यात येत आहे. या योजनेत शेतक-यांनी ३१ जुलै पर्यंत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पडघलमल यांनी दिली आहे.
     जिल्ह्यात पीक विमा योजना प्रसिद्धीची सुरूवात दक्षता पथकाचे अधिक्षक कृषी अधिकारी श्री मुळे आणि विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाचे अधिक्षक कृषी अधिकारी रफिक नाईकवडी यांच्या हस्ते विमा योजना विषयी माहिती असलेल्या प्रचार रथाला झेंडा दाखवून करण्यात आली.
       प्रधानमंत्री पीक विमा योजनेची उद्दिष्टे पुढील प्रमाणे-नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतक-यांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, शेतक-यांना नाविण्यपूर्ण व सुधारीत मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, कृषि क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेकरुन उत्पादनातील जोखमीपासून शेतक-यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा पिकांचे विविधीकरण आणि कृषि क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हा हेतू साध्य होण्यास मदत होणार आहे.
       ही योजना अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी आहे, कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी योजना ऐच्छिक आहे, अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडे पट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजनेंतर्गत सर्व पिकांसाठी ७० टक्के जोखिमस्तर निश्चित करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येणार असून शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतक-यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी २.० टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे, या प्रकारची प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
        या योजनेतर्गत हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पिक पेरणीपासून काढणी पर्यंत कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट वादळ चक्रीवादळ, पूरक्षेत्र जलमय होणे, भुसखलन, दुष्काळ पावसातील खंड, किड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्ती मुळे पिकांचे होणारे नुकसान आणि नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणी पश्चात नुकसान अशा जोखमीच्या कारणांमुळे होणा-या पिकांच्या नुकसानीस विमा संरक्षण दिले जाणार असल्याची माहितीही जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री पडघलमल यांनी दिली आहे.
**

No comments:

Post a Comment