Saturday, July 18, 2020

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवा ;कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार

•       कोरोना संसर्ग बाधित तातडीच्या उपचाराची गरज असलेल्या रुग्णाला तातडीने उपचार करा     
•         कोरोना चाचणी, रुग्णवाहिका, बेड व डॉक्टर याबाबतचे व्यवस्थापनात संगणकीकरण करा

    बारामती, दि. 18 : कोरोना विषाणूचा संसर्ग बारामती तालुक्यातही वाढत आहे. तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासोबतच कोरोना चाचणी, रुग्णवाहिका व्यवस्थापन, रुग्णालयातील बेड व्यवस्थापन आणि डॉक्टर याबाबतचे  नियोजन संगणकीय प्रणालीव्दारे करा तसेच या कामामध्ये कोणाचाही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा  पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
              जलसंपदा विभागाच्या विश्रामगृहात कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी बारामतीच्या नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, कार्यकारी अभियंता, पुणे पाटबंधारे विभाग धोडपकर, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, नगरपरिषद मुख्याधिकारी किरणराज यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. तांबे,  सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, ग्रामीण रूग्णालय रूईचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिल दराडे, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, जि.प. चे माजी बांधकाम सभापती संभाजी होळकर व संबंधित विभागाचे  अधिकारी उपस्थित होते.
           प्रथम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व सध्या उपचार घेत असलेल्या कोरोना रूग्णांची माहिती वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.  बारामती शहरासह ग्रामीण भागातही कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनाच्या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे. नवीन रुग्णांची भर पडणार नाही, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे तसेच संस्थात्मक क्वारंटाईन ठिकाणी आवश्यक त्या सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात.  बारामती शहरातील खासगी रूग्णालय कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी तातडीने ताब्यात घेण्याच्या बाबतही त्यांनी सूचना दिल्या. आरोग्य विभागाच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समन्वय साधून काम करावे, असेही  पवार यांनी सांगितले.  
            कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात मुंबईत प्रशासनाला यश आले आहे, त्याच धर्तीवर बारामती तालुक्यात उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले,  कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनासोबतच कोरोना चाचणी, रुग्णवाहिका, हॉस्पीटलचे बेड व्यवस्थापन, डॉक्टरचे नियोजन या सर्व महत्त्वाच्या उपाययोजनांचे संगणकीय प्रणालीच्या मदतीने नियोजन करा, त्यामुळे नियोजनात आणखी सुसूत्रता येईल. कोणत्याही परिस्थितीत उपचाराची गरज असलेल्या नागरिकांना उपचार मिळालेच पाहीजेत, असे स्पष्ट निर्देशही  त्यांनी दिले.
0 0 0 0  0

No comments:

Post a Comment