Friday, January 27, 2017

सक्षम करुया युवा व भावी मतदार

( राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त (25 जानेवारी,2017 अंक) विशेष लेख )


  
            संविधानाने आपल्याला मतदानाचा अमूल्य अधिकार दिला आहे. आपल्या देशात प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार घटनेने दिला असला तरी अधिकारासाठी भांडणारे आपण सर्व या नाण्याची दुसरी बाजू असलेल्या मतदान करण्याच्या कर्तव्याचे पालन किती करतो हा मोठा प्रश्न आहे.  मतदानाची आकडेवारी बघताना हेच जाणवते. याच पार्श्वभूमीवर तरुण वर्गाचा मतदान प्रक्रियेमध्ये मोठया प्रमाणावर समावेश व्हावा यासाठी जनजागृती व्हावी म्हणून दरवर्षी भारत निवडणूक आयोगातर्फे 25 जानेवारी 2017 रोजी राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
            या वर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिवसासाठी सक्षम करुया युवा भावी मतदार हे घोषवाक्य निश्चित करण्यात आले आहेवेगवेगळया पातळीवर यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.  महाविद्यालयीन स्तरावर युवक महोत्सव, मतदार दिनाची शपथ घेणे व नविन मतदारांना ओळखपत्राचे वाटप करणे, 15 ते 17 वयोगटातील विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीनची (EVM) ची माहिती करुन देणे,  Every vote count या संकल्पनेचा वापर करुन विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. भारतीय राज्यघटनेने दिलेला मतदानाचा अधिकार, मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, नागरिक म्हणून निर्भय व निस्पृहपणे मतदान करण्याचे महत्व याविषयावर व्याख्यान आयोजित करण्यात येत आहे. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त 209-शिवाजीनगर विधानसभा मतदार मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या मतदारांना तेथील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदार संघामध्ये शिल्लक असलेल्या नव्याने प्राप्त झालेल्या मतदार ओळखपत्रांचे वाटप करणार आहेततसेच यासाठी मतदार जाणीव-जागृती मोठया प्रमाणात करण्यात येत आहे.
            मतदार होण्यापूर्वीच जर भावी मतदारांना त्यांच्या अधिकाराची माहिती झाली तर इथून पुढे होणाऱ्या निवडणूकांमध्ये मतदानाचे प्रमाण नक्कीच वाढण्यास मदत होणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाने सैराट चित्रपटात नायक व नायीकेची भूमिका करणाऱ्या आकाश ठोसर व रिंकू राजगुरु अर्थात आर्चीला ब्रँड अम्बॅसिडर (सदीच्छादूत) बनवलं आहे. हे दोघे अद्याप मतदार नाहीत हे विशेष. गेल्या 3 वर्षात ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये तुलनेत अधिक "टक्का"  वाढलेला आपणास दिसला हा टक्का अर्थातच वाढला तो केवळ नवमतदार आणि जागरुक मतदारांमुळे वाढला आहे.
माध्यमांना श्रेय
            मतदानाची टक्केवारी वाढत आहे. हा सकारात्मक बदल घडवून आणण्याचे श्रेय माध्यमांना द्यावे लागेल.  निवडणूक आयोग विविध प्रकारे प्रचार आणि प्रसिध्दीचे काम करीत असते.  त्याला वृत्तपत्रांनी सकारात्मक असा प्रतिसाद दिला आहे. या खेरीज इलेक्ट्रॉनिक प्रचार माध्यमानी देखील यात आपला महत्वाचा वाटा उचलला आहे.  
            काही वर्षांपूर्वी  'पेड न्यूज' हा कळीचा मुद्दा बनला होता.  सोशल मिडीया, इंटरनेट, युटयूब, व्हॉटस् अपच्या वापरामुळे तर यावर आयोगाने मात केली आहे. आयोगाने प्रभावी अशी यंत्रणा उभी केली ज्यामुळे देशात निवडणुकीत वाहणारा पैसा आणि केवळ पैशावर आधारित निवडणूक हे समीकरण आता स्वत: माध्यमानी आणि मतदारांनी नाकारलेले दिसत आहे. आता तर सर्वसामान्य नागरिकांना याबद्दल गोपनियरित्या तक्रार करता यावी यासाठी निवडणूक आयोगाने कॉप नावाचे ॲप तयार केले आहे. याचेही श्रेय अर्थात नव्या पिढीतील नवमतदारांमध्ये जागृती घडविणाऱ्या निवडणूक आयोगाच्या प्रयत्नांसोबत माध्यमांना द्यावे लागेल.
            मतदान करण्याची प्रक्रिया आता डिजिटल  तंत्रामुळे अद्ययावत झालेली आहे. यात पूर्ण पारदर्शकता आणली गेली आहे. आता गरज आहे ती मतदारांनी मतदान करण्याची.  जगातील सर्वात मोठी लोकशाही  असणाऱ्या आपल्या या देशात मतदाराला राजा म्हटले जाते.  हा राजा आपले कर्तव्य बजावणारच असे जोवर ठरवत नाही  तोवर ही अधिकार आणि  कर्तव्यांची चर्चा सुरु राहील.                   
                                                                                                           
जयंत कर्पे,
माहिती सहायक,
जिल्हा माहिती कार्यालय,पुणे

000

No comments:

Post a Comment