Wednesday, January 25, 2017

लोकशाही अधिकाधिक प्रगल्भ व्हावी यासाठी नागरिकांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे . माहिती उपसंचालक मोहन राठोड राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त चर्चासत्र संपन्न


          पुणेदि25 राज्यघटनेने नागरिकांना विविध महत्वपूर्ण अधिकार प्रदान केले आहेत. भारतीय राज्यघटनेचे हे वैशिष्टय आहे. याच राज्यघटनेने स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार प्रदान केला आहे. भारतातील लोकशाही अधिकाधिक प्रगल्भ व्हावी यासाठी नागरिकांनी मतदान प्रक्रियेमध्ये मोठया प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन माहिती उपसंचालक मोहन राठोड यांनी आज येथे केले.
          वयाची 18 वर्ष पूर्ण केलेल्या नवतरुण मतदारांना आकर्षित करणे, मतदार यादीमध्ये त्यांचा समावेश होण्यासाठी आणि  शासनाच्या सेवेत कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा लोकशाही प्रक्रियेतील सहभाग वाढावा यासाठी दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री.मोहन राठोड बोलत होते. यावेळी ॲग्रोवनचे प्रतिनिधी संदीप नवले, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी वृषाली वृषाली पाटील उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शपथ दिली.
          यावेळी बोलताना श्री.राठोड म्हणाले की, भारतासारख्या आकाराने प्रचंड मोठया असलेल्या देशामध्ये विविधता आहे. विविध जाती-धर्माचे लोक इथे राहतात. या सर्वांचे वेगळेपण असूनही आपल्या राज्यघटनेने सर्वांना एकत्रित बांधले आहे. ही एकसंधता देशाचे मोठे सामर्थ्य आहे. घटनेने स्त्री-पुरुषांना समान अधिकार दिले आहेत. घटनेने दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा वापर डोळसपणे करुन नागरिकांनी मतदान प्रक्रियेमध्ये सामील व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तरुण वर्गाचा मतदान प्रक्रियेमध्ये मोठया प्रमाणावर समावेश व्हावा यासाठी सर्वांनी वैयक्तिक पातळीवर मतदानाबाबत जनजागृती करावी अशी सूचना त्यांनी केली.
          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती सहायक जयंत कर्पे यांनी केले तर प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
          या कार्यक्रमास माहिती सहायक सचिन गाढवे, प्रशिक्षणार्थी सुगत जोगदंड, रोहीत साबळे, विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
000


No comments:

Post a Comment