Friday, January 6, 2017

वृत्तपत्रांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवावे ..ज्येष्ठ विचारवंत अरुण खोरे

  


            पुणेदि06– समाजामध्ये विषमतेची दरी वाढत आहे. महाराष्ट्रात मुद्रित माध्यमांना मोठा इतिहास आहे. त्यामुळे वृत्तपत्रांनी सर्वसामान्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडावेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत अरुण खेारे यांनी केले.
            आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी,1832 रोजी सुरु केलेल्या दर्पण या पहिल्या मराठी वर्तमानपत्राचे संस्मरण व्हावे यासाठी दरवर्षी हा दिवस दर्पण दिन म्हणून राज्यभर साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने माहिती केंद्राच्या सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी अरुण खोरे बोलत होते. कार्यक्रमाला माहिती उपसंचालक मोहन राठोड, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी वृषाली पाटील, माहिती  सहायक सर्वश्री जयंत कर्पे, संग्राम इंगळे, सचिन गाढवे उपस्थित होते.
            यावेळी बोलताना अरुण खोरे यांनी माहिती व जनसंपर्क विभाग विविध उपक्रमाद्वारे शासनाची सकारात्मक बाजू नेटाने मांडण्याचे कार्य करीत आहे असे सांगितले. मराठी वृत्तपत्रसृष्टीला 185  वर्षांची प्रदिर्घ परंपरा आहे. माध्यमांनी दलीत, दुबळे व मागासवर्गीयांचे प्रश्न हिरीरीने मांडावेत.
            जगामध्ये वर्तमानपत्रांची संख्या कमी होत असतानाच भारतामध्ये मात्र वर्तमानपत्रांची संख्या वाढत आहे. माध्यमांनी दिखावा करण्याचे आणि राजकीय लाभार्थी होण्याचे टाळावे, ही काळाची गरज आहे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. वृत्तपत्रांनी जनतेचे प्रश्न मांडावे आणि  शासनाच्या चूका माध्यमांनी दाखवून देणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. महापुरुषांची शिकवण सर्वांनी आचरणात आणावी असे आवाहन अरुण खेारे यांनी यावेळी केले.
            माहिती उपसंचालक मोहन राठोड यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात वृत्तपत्रांनी समाज प्रबोधनाचे कार्य केले, स्वातंत्र्यप्राप्तीमध्ये वृत्तपत्रांचे योगदान मोठे आहे असे सांगितले. सध्याच्या माहिती तंत्रज्ञान युगामध्ये मुद्रीत माध्यमांचे महत्व टिकून आहे असे सांगून प्रसिध्दी माध्यमांमध्ये कार्यरत असणाऱ्यांनी वाचनाची आवड जोपासावी असे सांगितले. माहिती व जनसंपर्क विभाग आणि पत्रकार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यामुळे समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
            कार्यक्रमाच्या सुरुवातीला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात अला. या कार्यक्रमाला पत्रकार, विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयांचे कर्मचारी उपस्थित होते.
000

No comments:

Post a Comment