Wednesday, January 4, 2017

इंग्रजी निवासी शाळांतील प्रवेशासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना संधी



पुणे, दि. 4 (विमाका): आदिवासी विकास विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत नामांकित इंग्रजी निवासी शाळांमध्ये 2017-18 या वर्षात अनुसूचित जमातीच्या मुला- मुलींना इयत्ता पहिली व पाचवीत प्रवेश देण्यात येणार असून इच्छुकांनी आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी 30 जानेवारी 2017 पर्यंत प्रवेश अर्ज द्यावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी आर. आर. सोनकवडे यांनी केले आहे.
राज्याच्या आदिवासी विकास विभागाने अनुसूचित जमातीच्या मुलां-मुलींना इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत इंग्रजी शाळेत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 2017-18 या शैक्षणिक वर्षात प्रत्येक प्रकल्पासाठी अनुसूचित जमातीच्या  एक हजार मुलां-मुलींना नामांकित इंग्रजी निवासी शाळेत प्रवेश देण्याचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. त्या अनुषंगाने घोडेगाव प्रकल्पांतर्गत नामांकित निवासी इंग्रजी शाळेत इयत्ता पहिली व इयत्ता पाचवीत प्रवेश देण्यासाठी पुढील अटी व शर्तींच्या अधीन राहून प्रवेश देण्यात येणार आहे. इच्छुक पालकांकडून आपल्या पाल्याची नाव नोंदणी करण्यासाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव (ता. आंबेगाव) जि. पुणे प्रवेश अर्ज मागवीत आहेत. प्रवेश अर्ज प्रकल्प कार्यालयातील शिक्षण शाखेत विनामूल्य उपलब्ध आहेत.
अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडणे आवश्यक राहील. पालकांचा अनुसूचित जमातीचा सक्षम अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला. इयत्ता पाचवीच्या प्रवेशासाठी चौथीतील विद्यार्थ्यांची 100 गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. पाल्याची नजीकच्या काळातील दोन छायाचित्रे, जन्मनोंदणीचा दाखला जोडणे आवश्यक राहील. पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये एक लाख रुपयाच्या आत असल्याबाबतचा तहसीलदारांनी दिलेला दाखला जोडावा. इतर नातेवाईकांचा उत्पन्नाचा दाखला जोडू नये. पालक दारिद्र्यरेषेखालील असल्यास त्यांच्या पाल्यास प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. महिला पालक, विधवा, घटस्पोटीत, निराधार, परितक्त्या असल्यास त्यांच्या पाल्यास प्रथम प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. पालक महाराष्ट्रातील रहिवाशी असणे आवश्यक असून तसा रहिवाशी दाखला जोडावा. पाल्यांची वैद्यकीय तपासणी केली असल्याचे व त्यास कोणताही गंभीर आजार नसल्याचे अलीकडील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मराठीत प्रमाणपत्र जोडावे.
संपर्कासाठी व अधिक माहितीसाठी ०२१३३-२४४२६६ किंवा २४४२७७ या क्रमांकावर संपर्क साधावा. अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही. प्रवेश मंजूर करणे किंवा नाकारण्याचा अधिकार प्रकल्प अधिकारी यांनी राखून ठेवला आहे, असेही श्री. सोनकवडे यांनी कळविले आहे.
००००


No comments:

Post a Comment