Friday, January 6, 2017

डीजी धन मेळाव्यात समाजातील सर्व घटकांना सहभागी करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करा -जिल्हाधिकारी सौरभ राव यांची सूचना


Ø  एस.पी. कॉलेजच्या प्रांगणात शनिवारी सकाळी ११ पासून मेळाव्याला सुरुवात
Ø  केंद्रिय मंत्री स्मृती ईराणी, सुभाष भांमरे यांची विशेष उपस्थिती
Ø  कॉलेज विद्यार्थ्यांसह शेतकरी, कामगार, गृहिणी, दुकानदारांचा सहभाग

पुणे दि. 5 : रोखरहित महाराष्ट्राच्या दिशेने यशस्वी वाटचाल करुन डिजीटल अर्थप्रणालीला चालना देण्यासाठी शनिवारी येथील एसपी कॉलेजवर आयोजित करण्यात आलेल्या डीजी धन मेळाव्याला २० हजारहून अधिक लोक भेट देणार आहेत. या मेळाव्यात समाजातील सर्व घटकांना सहभागी करुन घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी आज केल्या.
शनिवार दि. ७ जानेवारी २०१७ रोजी येथील एस. पी. कॉलेजच्या प्रांगणात आयोजित डीजी धन मेळाव्याच्या तयारीचा सर्व विभागांचा आढावा जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांच्यासह सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सौरभ राव म्हणाले, डिजी धन मेळावा हा केंद्र सरकार, राज्य सरकार आणि सर्व बँका यांचा संयुक्त कार्यक्रम आहे. हा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम असून या मेळाव्याच्या माध्यमातून समाजातील सर्व सामान्य लोकांपर्यंत डिजीटल अर्थप्रणालीची माहिती पोहोचणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते एसपी कॉलेजच्या प्रांगणात सकाळी ११ वाजता होणार आहे. तर दुपारच्या सत्रात एस. पी. कॉलेजच्या लेडी रमाबाई सभागृहात लकी ड्रॉ केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती ईराणी, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांची प्रमुख उपस्थिती राहील. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी व हजारो नागरिकांची उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्यात ६० स्टॉल सहभागी होणार आहेतयावेळी जिल्ह्यातील १० ग्रामपंचायती व १० नगरपालिकांना डिजीटल म्हणून घोषित करण्यात येणार आहे. तसेच लकी ग्राहक योजनेअंतर्गत लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे.
या मेळाव्यात इलेक्ट्रॉनिक, हस्तकला, कपडे, खाद्यपदार्थ आदी  विविध वस्तूंच्या तसेच बचत गटांचे व  विविध बँका, आपले सरकार सेवा केंद्र, आधार केंद्र यांच्या सेवांचा समावेश असलेल्या 60 स्टॉलची उभारणी करण्यात येत आहे. या ठिकाणी सर्व व्यवहार हे डिजिटल स्वरुपात करण्यात येणार आहेत. यासाठी रुपे कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, आधार आधारित पेमेंट, यूपीआय, यूएसएसडी आदी मार्गांचा वापर करण्यात येणार आहे. यावेळी बँकांचे नवीन खाते उघडणे, बँक खात्याशी मोबाईल क्रमांक जोडणे, आधार नोंदणीतील दुरुस्ती व अद्यावतीकरण, बँक खात्याशी आधार क्रमांक जोडणी आदी विविध सेवाही देण्यात येणार आहेत.
या मेळाव्याला शासनाच्या सर्व विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भेट देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. राव यांनी केल्या. हा मेळावा अधिक व्यापक होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. राव यांनी केल्या. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
******

मेळाव्याची वैशिष्ठ्ये-
Ø   मेळाव्याला २० हजारहून अधिक लोक भेट देणार. 
Ø  मेळाव्यातील एकूण ६० पैकी २९ स्टॉल विविध बँकांसाठी.
Ø  मेळाव्यात डिजीटल अर्थप्रणालीसंबंधी चे विविध मोबाईल ॲप डाऊन लोड करुन मिळाणार.
Ø  मेळावा परिसरात बीएसएनएल व रिलायन्स जीओची उच्च क्षमतेची वायफाय सेवा.
Ø  कृषी विभागाशी संबंधित महाबीज, आरसीएफ, फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीसह विविध स्टॉलचा सहभाग.
Ø  मेळाव्यात संपुर्ण कॅशलेस व्यवहार होणार.
Ø  शहराच्या मध्यवर्ती एसपी कॉलेजमध्ये मेळावा, पार्कींगसाठी ४ एकर प्रशस्त जागा.
Ø  खादी ग्रामोदद्योग, नेसकॉम, कात्रज डेअरी, जिल्हा ग्रामीण यंत्रणेचे स्टॉल.
Ø  ग्राहकपेठसह आरटीओ, पुणे महानगरपालिकेचे स्टॉल.
Ø  डिजीटल व्यवहारासंबंधी विशेष मार्गदर्शन.
Ø  जिल्ह्यातील १० ग्रामपंचायती, १० नगरपालिकांना डिजीटल घोषित करणार.
Ø  मेळाव्यात लकी ग्राहक योजनेअंतर्गत लकी ड्रॉ काढण्यात येणार.
Ø  संपर्कासाठी फेसबुक fb.me/Collectorofficepune व ट्विटर http:twitter.com/CollectorPune लिंक.
******




No comments:

Post a Comment