Thursday, January 19, 2017

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक संनियंत्रण अधिकाऱ्यांनी जबाबदारी चोखपणे पार पाडावी ... जिल्हाधिकारी सौरभ राव



            पुणेदि19 राज्य निवडणूक आयोगाने पुणे जिल्हा परिषदेच्या 75 गट व 150 गणांचा निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आहे. त्यानुसार संपूर्ण जिल्हयात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. सदर आदर्शआचार संहितेची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी आज येथे केले.
            जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी आणि निवडणूक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संनियंत्रण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना ते मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे,निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, जिल्हा परिषद व पंचायत समिती समन्वय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण उपस्थित होते.
            यावेळी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सर्व संबधितांना मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी यासाठी विशेष प्रयत्न करावे असे सूचित केले. त्यासाठी गृहनिर्माण संस्थांमध्ये जनजागृतीसाठी करावी, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक तसेच सोशल मिडीयामार्फत मतदान करण्याविषयी प्रसिध्दी करावी अशा सूचना केल्या. निवडणूक आयोगातर्फे तयार करण्यात आलेल्या कॉप ॲपचा वापर करण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करणे, संशयास्पद व्यवहारावर नजर ठेवणे, मतदान केंद्रावर मतदारांना तात्काळ मतदान करण्यासाठी व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
            या बैठकीला जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दिनकर देशमुख,प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी  अभियंता धनंजय देशपांडे, तहसीलदार महेश पाटील, सहायक पोलीस आयुक्त विक्रम पाटील तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
000


No comments:

Post a Comment