Thursday, January 26, 2017

देशासमोरील आव्हानांना तोंड देण्यासाठी महाराष्ट्र सज्ज --पालकमंत्री गिरीश बापट प्रजासत्ताक दिनाचा वर्धापन दिन समारंभ उत्साहात साजरा


पुणेदि. 26 –  देशाच्या स्वाभिमानावर, एकतेवर, सुरक्षिततेवर ज्या- ज्या वेळी आक्रमण झाले त्या- त्या वेळी महाराष्ट्र नेहमीच देशासाठी धावून गेला आहे. देशा समोरील आव्हानांना तोंड देण्यासाठी यापुढेही महाराष्ट्र सज्ज असल्याची ग्वाही पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज येथे दिली.
            भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सदुसष्टाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ध्वजारोहणाच्या समारंभात पालकमंत्री श्री. बापट बोलत होतेशिवाजीनगर येथील पोलीस संचलन मैदानावर झालेल्या या कार्यक्रमास विभागीय आयुक्त एसचोक्कलिंगमपोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी प्रमुख उपस्थित होते.
            सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले की, 15 ऑगस्ट 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि स्वतंत्र भारताच्या पुढील योजना काय असतील, देश कोणत्या दिशेने वाटचाल करेल हे ठरविण्यासाठी देशाची घटना बनविली गेली. या राज्यघटनेची आखणी, मांडणी करण्यासाठी एक मसुदा समिती नेमली होती त्या समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार हा बहुमान त्यांना आम जनतेने बहाल केला आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपण सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित झालो. आपण हा राष्ट्रीय सण धार्मिक उत्सवांसारखाच मोठया आनंदाने, कौतुकाने, उत्साहाने साजरा करतो. स्वातंत्र्यासाठी बलीदान दिलेल्या राष्ट्रवीरांना यानिमित्ताने आदरांजली वाहणे आपले कर्तव्य आहे, असे ते म्हणाले.
            पालकमंत्री पुढे म्हणाले की,  साऱ्या जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुध्दांचा हा देश आहे. पण या शांतीप्रिय देशात अशांतता निर्माण करणाऱ्या प्रवृतींचा धोका जाणवत आहे. अशा प्रवृतींना नामशेष करण्याची ताकत भारताजवळ आहे. अशा प्रवृतींविरुध्द समाजातील सर्व घटकांनी एकत्र येवून संघटीतपणे लढा देण्यासाठी सज्ज होऊया, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
            जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशाकडे सारे जग एका आशेने पाहात आहे. जगाला मार्गदर्शन करण्याची पात्रता भारताजवळ असून ही अपेक्षा पूर्ण करण्यास भारतीय नागरिक म्हणून आपण प्रयत्न करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. निरक्षरता, गरिबी, अस्वच्छता हेही समाजाचे शत्रु आहेत. स्वच्छ व सुंदर परिसर निर्माण करण्यासह पर्यावरणाचा समतोल राखताना मानव जीवन समृध्द करण्याची आज आपण शपथ घेऊया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
            यावेळी पालकमंत्री बापट यांच्याहस्ते राष्ट्रपती पोलीस पदक विजेते पोलीस अधिकारी कर्मचारी,  खेळाडू आणि हरित सेनेच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रपती पोलीस पदक विजेते सहायक पोलीस आयुक्त सुनील खळदकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह गायकवाड, पोलीस निरीक्षक संजय नाईक- पाटील, महिला पोलीस निरीक्षक सीमा मेहेंदळे, पोलीस उपनिरीक्षक बबनराव भोर, सहायक पोलीस उपनिरीक्षक सर्वश्री पुनाजी डोईजड, अशोक झगडे, अरुण पोटे, अजिनाथ वाकसे, पोलीस हवालदार सर्वश्री विलास घोगरे, बळवंत यादव तसेच अशोक कांबळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
            संत तुकाराम वनग्राम योजनेंतर्गत प्रथम क्रमांक- कडबनवाडी (ता. इंदापूर), द्वितीय क्रमांक साकुर्डे (ता. भोर) आणि तृतीय क्रमांक वळती (ता. आंबेगाव) यांना बक्षीस वितरण करण्यात आले. याशिवाय सामाजिक वनीकरण विभागाकडून वनीकरणामध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या तीन शाळांचाही पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. क्रीडा विभागातर्फे विविध गुणवंत क्रीडा पुरस्कार देण्यात आले. यामध्ये गुणवंत खेळाडू पुरस्कार (महिला) साक्षी तुषार मळभट, गुणवंत खेळाडू पुरस्कार (पुरुष) स्वप्नील बाळासाहेब ढमढेरे, क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार भुपेंद्र आचरेकर, क्रीडा संघटक मृदुला महाजन, क्रीडा शिक्षक पुणे मनपा क्षेत्र- हर्षल निकम, क्रीडा शिक्षक पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्र- राजेंद्र महाजन, क्रीडा शिक्षक पुणे ग्रामीण क्षेत्र- निनाद येनपुरे, महिला क्रीडा शिक्षक- श्रीमती शबाना शेख यांना पुरस्कार देण्यात आले.
            श्री. बापट यांनी यावेळी उपस्थित स्वातंत्र्यसैनिकांची भेट घेतली. कार्यक्रमात पोलीस दलगृहरक्षक दल, अग्नीशमन दल आणि नागरी संरक्षण दलाने शानदार संचलनाव्दारे पालकमंत्री गिरीश बापट यांना मानवंदना दिलीयामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या पथकांचाही समावेश होता. संचलनामध्ये सामाजिक वनीकरण, वन विभाग, पुणे महानगरपालिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र (बार्टी) तसेच महाराष्ट्र बँकेच्या चित्ररथांचाही सहभाग होता. शेवटी शालेय विद्यार्थ्यांनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
            यावेळी आमदार माधुरी मिसाळ, यांच्यासह लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000000



No comments:

Post a Comment