Wednesday, January 25, 2017

सक्षम करुया युवा व भावी मतदार’ राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त रॅलीला उत्स्फुर्त प्रतिसाद



सोलापूर दि.25 :- लोकशाहीचे बळकटीकरण व्हावे, मतदार नोंदणी आणि मतदानामध्ये युवकांचा सहभाग वाढावा यासाठी राष्ट्रीय मतदान दिनी सोलापूर शहरातून मतदार रॅली काढण्यात आली. या मतदार रॅलीचा शुभारंभ पार्क चौक येथे जिल्हाधिकारी रणजीतकुमार, महानगरपालिका आयुक्त विजय काळम – पाटील, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एन.एन.मालदार यांनी रॅलीस हिरवा झेंडा दाखवून केला. ही रॅली पार्क चौक येथून आंबेडकर पूतळा, डफरीन चौक, हरीभाई देवकरण प्रशाला या मार्गे रंगभवन पर्यंत काढण्यात आली.
25 जानेवारी हा निवडणूक आयोगाच्या स्थापनेचा दिन हा मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून सोलापूर येथे जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन आणि सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने या मतदार रॅलीचे आयेाजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप,  श्री. सतीश धुमाळ, महापालिकेचे उपायुक्त बी.पी.पाटील उपस्थित होते.
 सक्षम करुया युवा व भावी मतदार हे यावर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिनाचे घोषवाक्य आहे. युवकांनी निर्भिडपणे मतदान करावे तसेच भावी मतदारांनी आपली नोंदणी करावी यासाठी निवडणूक आयोग विविध उपक्रम राबवित आहे. शहरात आज काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये सोलापूर विद्यापीठ, दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालय, निर्मलाताई ठोकळ प्रशाला, कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्यूकेशन अध्यापक विद्यालय, महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी, छत्रपती शिवाजी प्रशाला, छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज, ए.आर.बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय, शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्था, वालचंद कॉलेज ऑफ आर्टस ॲन्ड सायन्स, लक्ष्मीबाई भाऊराव महिला विद्यालय, सिंहगड कॉलेज, भाई अर्जुनसिंग चंदले समाजकार्य महाविद्यालय, वालचंद टेक्निकल इन्स्टिट्युट, सोलापूर सोशल आर्टस अँन्ड कॉमर्स कॉलेज, एनएसएसचे विद्यार्थी  यांच्यासह शहरातील अन्य शाळा व  महाविद्यालयांचा विद्यार्थ्यांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला.
तत्पूर्वी पार्क चौक येथे आर्कीट कॉलेज आणि सिध्देश्वर इंग्लिश मिडीयम शाळेच्या विद्यार्थ्यांनी मतदान जागृतीसाठी  पथनाट्य सादर केले.
*****



No comments:

Post a Comment