Thursday, January 19, 2017

अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत गुटखा व अनुषंगिक पदार्थाचा साठा जप्त


सोलापूर दि. 20 :-  अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत  गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखू आणि सुपारीचा साठा जप्त करण्यात आला असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त सं. भा. नारागुडे यांनी कळविले आहे.
अन्न  व औषध प्रशासन विभागास मिळालेल्या माहितनुसार  अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती न. त. मुजावार व नि. सु. मासारे यांनी  मे. एम. एस. कोठावळे, 28 पूर्व मंगळवार पेठ सोलापूर यांच्या दुकानावर धाड टाकून तपासणी केली असता या ठिकाणी  विविध प्रकारचे प्रतिबंधित अन्न पदार्थ गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारीचा रुपये 40 हजार 790 साठा, मे. बालाजी ट्रेडर्स, 27 जोडभावी पेठ, सोलापूर येथे धाड टाकून तपासणी केली असता येथेही रुपये तीन लाख  चार हजार 800 रुपयांचा साठा, मे. महेश ट्रेडर्स, 35 जोडभावी पेठ येथे तपासणी केली असता येथेही चार हजार 949 रुपयांचा साठा विक्रीसाठी साठविल्याचे आढळून आले.  हा साठा अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत जप्त करुन ताब्यात घेण्यात आला. मे. एम.एस. कोठावळे 218 पूर्व मंगळवार पेठ, सोलापूरचे पेढी मालक भारत कोठावळे आणि पेढी विक्रेता महादेव कोठावळे, मे. बालाजी ट्रेडर्स, 27 जोडभावी पेठ, सोलापूरचे पेढी मालक विजय संतोषकुमार निरंकारी आणि मे. महेश ट्रेडर्स, 35 जोडभावी पेठेचे पेढी मालक संतोष लक्ष्मण भिंगारे यांनी सदरचा साठा कोणाकडून आणला याबाबतचा तपास अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.  मे. एम. एस. कोठावळे यांच्या विरुद्ध वारंवार प्रतिबंधित पदार्थ्याची विक्री व साठवणूक केल्यामुळे त्यांच्या विरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व परवाना नोंदणीधारकांनी प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखू आणि सुपारी इत्यादी विक्री अथवा साठा  करु नये. अशा प्रकारचा साठा आढळून आल्यास त्यांच्या विरुद्ध अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत योग्य कारवाई करण्यात येईल असेही सहायक आयुक्त सं. भा. नारागुडे यांनी कळविले आहे.
00000

No comments:

Post a Comment