Friday, May 22, 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज अंतर्गत कोणत्याही राज्य योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विना शिधापत्रिकाधारकांना मे 2020 व जून 2020 या दोन महिन्याचे कालावधीकरिता धान्य देणार-जिल्‍हाधिकारी राम



पुणे, दिनांक 22- अन्न व नागरी पुरवठा विभागाच्‍या  शासन निर्णयाप्रमाणे आत्मनिर्भर भारत सहाय्य पॅकेजांतर्गत केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत किंवा कोणत्याही राज्य योजनेंतर्गत समाविष्ट नसलेल्या विना शिधापत्रिकाधारकांना माहे मे 2020 व जून 2020 या दोन महिन्यांच्‍या कालावधीकरिता 5 किलो तांदूळ वितरीत करण्‍यात येणार असल्‍याचे जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी कळविले आहे

            हे धान्यवितरण विना शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना ऑफलाईन पध्‍दतीने करण्‍यात येणार आहे. अशा लाभार्थ्यांकडून त्यांचे आधारकार्ड क्रमांक किंवा कोणतेही शासकीय ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्याची पुराव्यादाखल स्वतंत्र नोंद करण्‍यात येईल. मे व जून 2020 महिन्‍याचे धान्य वितरण जून 2020 पासून सुरु होईल.

       केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासाठी एकूण 113 अन्नधान्य वितरण केंद्रे निश्चित करण्यात आलेली असून त्याबाबत स्वतंत्रपणे दि.22 मे 2020 रोजी आदेश पारित करण्‍यात आलेला आहे. एकूण 1 लाख 39 हजार 882 लाभार्थ्यांना मोफत तांदूळ वितरीत करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित परिमंडल अधिकारी, तलाठी, स्थानिक नगरसेवक व अन्नधान्य वितरण केंद्रे यांच्‍यामार्फत विना शिधापत्रिकाधारकांना विहीत नमुन्यातील अर्ज वाटप केले जाणार आहेत. विना शिधापत्रिकाधारकांनी  विहीत नमुन्यात भरलेले अर्ज नजिकच्‍या अन्नधान्य वितरण केंद्रात दि.30 मे 2020 पर्यंत जमा करावयाचे आहेत. ज्या अन्नधान्य वितरण केंद्रामध्ये विना शिधापत्रिकाधारक अर्ज भरुन देतील त्याच अन्नधान्य वितरण केंद्रातून संबंधितास अन्नधान्याचे वितरण करण्‍यात येईल. अन्नधान्य घेतांना या अर्जाची पोच सोबत आणणे आवश्यक असल्‍याचेही जिल्‍हाधिकारी राम यांनी कळविले आहे.

जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी आपले अर्ज 30 मे 2020 पर्यंत जमा करावे, असे आवाहन अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment