Wednesday, May 20, 2020

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा डॉ. म्हैसेकर यांनी घेतला जिल्हानिहाय आढावा*

महसूल, पोलीस, आरोग्य व महानगरपालिका अधिकाऱ्यांशी साधला संवाद

        पुणे, दि.20: पुणे विभागात कोरोना संसर्गजन्य रोगामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा तसेच कायदा व सुव्यवस्थेचा पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर या जिल्हयांचा जिल्हानिहाय आढावा  विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे घेतला. 

  यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, प्रताप जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख आदी उपस्थित होते. 

  डॉ. म्हैसेकर म्हणाले, पर राज्यातून व पर जिल्हयातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करुन घेवून त्यांच्या अलगीकरणाबाबत सर्वांनी विशेष दक्षता घ्यावी. जिल्हयांत शहरी व ग्रामीण भागातील संशयित, बाधित रुग्ण, मृत्यू झालेले रुग्ण याबाबतचा अहवाल वेळोवेळी पाठवत राहण्याच्या सूचना डॉ. म्हैसेकर यांनी केल्या. महानगरपालिका, जिल्हा परिषदा, जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या वतीने उपाययोजना राबवित असताना  कंटेन्मेंट झोनमधील रुग्ण दर वाढू नये याची काळजी घेण्यात यावी. तसेच रक्तदाब, श्वसनाचे विकार असणारे (कोमार्बिलिटी) नागरिक कोरोना बाधीत होऊ नयेत, यासाठी त्यांची माहिती अद्ययावत करुन त्यांची काळजी घेण्याबाबत त्यांनी सूचना केल्या.

  यावेळी पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर जिल्हयाचे जिल्हाधिकारी अनुक्रमे नवल किशोर राम, दौलत देसाई, शेखर सिंह, अभिजित चौधरी व मिलिंद शंभरकर यांनी कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. 
000000

No comments:

Post a Comment