Wednesday, May 20, 2020

पावसाळ्यापूर्वी अत्यावश्यक कामे पूर्णत्वास न्यावीत -जिल्हाधिकारी नवल किशोर राम




     पुणे दि. 20 : - संभाव्य आपत्कालीन परिस्थितीमध्ये करण्यात येणाऱ्या निवारण कार्यात सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून पावसाळ्यापूर्वी अत्यावश्यक कामे पूर्णत्वास न्यावीत, अशी सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली.
  जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सून पूर्व तयारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक जिल्हाधिकारी श्री.राम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, पोलीस अधीक्षक संदीप पाटील आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
  जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी धरणनिहाय समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. जिल्हयातील सर्व धरणांचे बांधकाम तपासणी पावसाळयापूर्वी  करुन घ्यावी. धरणांचे गळतीबाबत पावसाळ्यापूर्वी कार्यवाही करावी.  पाटबंधारे विभागाने जिल्हयातील सर्व धरणांच्या धरण सुरक्षेच्या दृष्टीने नियोजन करावे. तसेच नदीपात्रालगत, पात्रातील  झोपडपट्टया व इतर धोक्यांच्या ठिकाणाचा अभ्यास करुन त्याची माहिती घेवून नदीपात्रातील अतिक्रमणे काढावीत. सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषदेने जिल्हयातील धोकादायक पुलांची पावसाळ्यापूर्वी पाहणी करावी. जुन्या इमारती, वाडे बांधकामांची तपासणी करावी. पावसाळयापूर्वी सर्व रस्त्यांचे पट्टे भरुन घ्यावेत. तसेच महामार्गालगत, रस्त्यालगत उत्खननामुळे बंद झालेल्या मोऱ्या कार्यान्वित करणे. धोकादायक ठिकाणी  संबंधिक विभागाशी समन्वय ठेवून प्रवेश निषिध्द करावा. याबाबत बोर्ड लावण्यात यावेत.
  जिल्हा शल्यचिकीत्सकांनी व  जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पूर नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापनासाठी आरोग्य विषयक स्वतंत्र कक्ष स्थापन करावा. आपत्कालीन ॲम्ब्यूलन्सचा टोल फ्री क्रमांक सर्व विभागांना देण्यात यावा. तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी समन्वय अधिकारी, कर्मचारी यांचे पत्ते व संपर्क क्रमांकासह जिल्हा नियंत्रण कक्षास यादी सादर करावी. पावसाळ्याच्या कालावधीमध्ये शहरात व ग्रामीण भागात कोरोनाबरोबरच इतर साथीच्या रोगाचा प्रसार  होऊ नये यासाठी उपाययोजना कराव्यात. 
  कृषी विभागाने गारपीट, अवकाळी पाऊस झाल्यास,  शेतकऱ्यांच्या पिकांचे, फळपिकांचे नुकसानीचे पंचनामे पूर्ण करुन अहवाल सादर करावा. या कामासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी, यांनी समन्वय ठेवावा. पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, छावणी नगरपरिषद, सर्व नगर परिषदा यांनीही आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच पोलीस आयुक्तालय पुणे व पिंपरी चिंचवड शहर, ग्रामीण विभाग,  उपविभागीय अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विभाग, नागरी संरक्षण दल, राष्ट्रीय सेवा योजना, महाराष्ट्र राज्य विद्युत विभाग, भारत संचार निगम विभाग औद्योगिक सुरक्षा, हवामान विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग, महसूल विभाग या सर्व यंत्रणांनी  एकमेकांशी समन्वय ठेवून पावसाळ्यापूर्वी चांगले नियोजन करावे, अशाही सूचना श्री. राम यांनी दिल्या.
  यावेळी सर्व संबंधित यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0000

No comments:

Post a Comment