Monday, October 1, 2018


"ज्येष्ठोत्सव-2018" निमित्‍त सामाजिक न्‍याय मंत्री बडोले यांनी दिल्‍या काव्‍यमय शुभेच्‍छा
            पुणे, दिनांक 1 – आमच्‍याच युध्‍दात आम्‍ही कधी हारलो, कधी जिंकलो.. काही स्‍वप्‍ने दुभंगली, काही स्‍वप्‍ने झाली खरी... अशा काव्‍यमय शब्‍दांत ज्‍येष्‍ठ नागरिकांच्‍या कटू-गोड आठवणी व्‍यक्‍त केल्‍या सामाजिक न्‍याय विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांनी. निमित्‍त होते जागतिक ज्‍येष्‍ठ नागरिक दिनाचे.
            आज पुण्‍यात सामाजिक न्‍याय विभागाच्‍या वतीने "ज्येष्ठोत्सव-2018"  या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. या राज्‍यस्‍तरीय कार्यक्रमाचे उद्घाटन श्री.बडोले यांनी केले.  त्‍यावेळी त्‍यांनी आपली कविता सादर केली. कार्यक्रमास सामाजिक न्‍याय राज्‍य मंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आमदार मेधा कुलकर्णी, बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्‍थेचे (बार्टी) महासंचालक कैलास कणसे,  शां.ग. महाजन, अभिनंदन थोरात, प्रतिभा शाहू मोडक, माधव वझे, सुधीर गाडगीळ, विश्वास मेहंदळे, डॉ. मोहन आगाशे ज्येष्ठ अभिनेत्री दीपा लागू, ज्येष्ठ लेखिका अरुणा ढेरे, ज्‍येष्‍ठ व्‍यंगचित्रकार शि. द. फडणीस आदींची उपस्थिती होती.   
             उद्घाटक श्री बडोले हे  संवेदनशील कवी असल्‍यामुळे आमदार मेधा कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाच्‍या उद्घाटनासाठी श्री. बडोले यांना ज्‍येष्‍ठ नागरिकांवर कविता करण्‍याची विनंती केली होती. त्‍यानुसार त्‍यांनी रात्री जागून ज्‍येष्‍ठ नागरिकांच्‍या मानसिक जडणघडणीवर प्रकाश टाकणारी भावपूर्ण कविता सादर केली. त्‍यांच्‍या या कवितेला सर्वांनीच टाळ्यांच्‍या कडकडाटाने प्रतिसाद दिला.
            सामाजिक न्‍याय मंत्री बडोले यांनी ज्‍येष्‍ठ नागरिकांचे अनेक प्रश्‍न मार्गी  लावण्‍यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्‍न करत असल्‍याची ग्‍वाही दिली. ज्‍येष्‍ठ नागरिक सुस्थितीत असावा, त्‍याचे आरोग्‍य चांगले रहावे, यासाठी जुलै 2018 मध्‍ये वेगवेगळ्या विभागांनी काय करायचे याची जबाबदारी निश्चित करण्‍यात आल्‍याचे त्‍यांनी सांगितले.  रुग्‍णालयांमध्‍ये ज्‍येष्‍ठ नागरिकांसाठी 5 टक्‍के जागा राखीव ठेवणे,आरोग्य तपासणी शिबीरे घेणे, उद्यानांमध्‍ये बसण्‍यासाठी बाके उपलबध करुन देणे, एकाकी नागरिकांना सदिच्‍छा भेट देणे, करमणूक केंद्र, देखभाल व विरंगुळा केंद्र स्‍थापन करणे, अंत्‍योदय योजनेंतर्गत शिधा स्‍वस्‍त दरात देणे, ज्‍येष्‍ठ नागरिकांसाठी पोलीस विभागाने प्रतिसाद अॅप विकसित करणे, पोलीस स्‍थानकात समुपदेशक नेमणे, विद्यार्थ्‍यांनी ज्‍येष्‍ठ नागरिकांशी कसे वागावे,याचे मार्गदर्शन करणारा धडा पाठ्यपुस्‍तकात समाविष्‍ट करणे अशा विविध उपाय योजनांची माहिती त्‍यांनी दिली. ज्‍येष्‍ठ नागरिकांच्‍या समस्‍या सोडवण्‍यास आपले प्राधान्‍य राहील, असे सांगून त्‍यांनी सर्वांना ज्‍येष्‍ठ नागरिक दिनाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या.
राज्‍यमंत्री दिलीप कांबळे यांनी ज्‍येष्‍ठ नागरिकांच्‍या मार्गदर्शनाचा समाजाला लाभ होत असल्याचे सांगून शासनाच्‍या ज्‍येष्‍ठ नागरिकांसाठी असलेल्‍या कल्‍याणकारी योजनांची माहिती दिली. खासदार अनिल शिरोळे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, मोहन आगाशे, दीपा लागू, अरुणा ढेरे, माधव वझे, अभिनंदन थोरात, प्रतिभा शाहू मोडक, सुधीर गाडगीळ यांचीही यावेळी समयोचित भाषणे झाली.
            कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्‍वलनाने झाले. प्रास्‍ताविकात आ. मेधा कुलकर्णी यांनी ज्‍येष्‍ठोत्‍सव 2018 च्‍या आयोजनामागचा उद्देश सांगितला. यावेळी  डॉ. अरविंद संगमनेरकर, न.म. जोशी, लता पुणेकर,  विनोद शहा, मनीषा साठे, बापूसाहेब घाटपांडे, म.भा. चव्‍हाण, वयाची शंभरी पार केलेल्‍या नलिनी देवधर, वसंतराव म्‍हस्‍के, अशोक नाफडे आदींसह  विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय ज्येष्ठ नागरीकांसाठी आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्‍यात आले. माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्‍या स्‍मृतींना आदरांजली म्‍हणून विनामुल्य आरोग्य तपासणी शिबीराचेही आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमस्‍थळी  बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री तसेच करमणूकीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोथरुड ज्‍येष्‍ठ नागरिक महासंघाच्‍या संकेतस्‍थळाचे आणि आनंदी ज्‍येष्‍ठ नागरिक संघाच्‍या पुस्तिकेचे प्रकाशन उपस्थितांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमास बार्टीचे प्रकल्‍प संचालक दिनेश डोके, रुपाली आवळे, डॉ. वझरकर आदींसह ज्‍येष्‍ठ नागरिक उपस्थित होते. 


No comments:

Post a Comment