Monday, October 1, 2018

टंचाई परिस्थितीचा अहवाल लवकरात लवकर पाठवा पालकमंत्री विजय देशमुख यांच्या सूचना


सोलापूर, दि. १ : सोलापूर जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती बाबतचा अहवाल लवकरात लवकर राज्य शासनाकडे पाठविण्यात यावा, अशा सूचना पालकमंत्री विजय देशमुख यांनी आज येथे दिल्या.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सभागृहात आज पालकमंत्री विजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.  बैठकीस मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलीस आयुक्त एम. बी. तांबडे, पालिका आयुक्त अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे आदी उपस्थित होते.
            पालकमंत्री विजय देशमुख यांनी सांगितले की, जिल्ह्यातील दुष्काळी  परिस्थिती  पहाता राज्य शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळविण्यासाठी परिपूर्ण अहवाल पाठविण्याची गरज आहे. त्यासाठी महसूल विभाग, कृषि विभाग, जिल्हा परिषद आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने एकत्रित येऊन टंचाई आराखडा तयार करावा.
            अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी यांनी जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामांचा आढावा घेतला. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे मंजूर रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करावी. जिल्ह्यातील बंधाऱ्यांना आवश्यक असणारे बरगे लावण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून घ्या, असे सांगितले.
            बैठकीस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे, पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, उपजिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, अग्रणी बँक व्यवस्थापक चंदनशिवे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प व्यवस्थापक संजय कदम, उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप आदी अधिकारी उपस्थित होते.



No comments:

Post a Comment