Monday, October 8, 2018

रेशन दुकानदारांच्या मागण्यांबाबत लवकरच बैठक घेणार : पालकमंत्री



सोलापूर, दि. ८ - रेशन दुकानदारांच्या मागण्या सोडविण्यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांच्या बरोबर बैठक आयोजित केली जाईल, असे पालकमंत्री विजय देशमुख यांनी आज येथे सांगितले.
            सोलापूर शहरातील स्वस्त धान्य दुकानदारांची आज आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री देशमुख बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहूद्देशीय सभागृहात झालेल्या या बैठकीस अन्न धान्य वितरण अधिकारी श्रीमंत पाटोळे, जिल्हा पुरवठा अधिकारी रामचंद्र उगिले, सहाय्यक अन्न धान्य वितरण अधिकारी रमा जोशी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील रावडे, रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष बापू गंदगे, सचिव सुनील पेंटर आदी उपस्थित होते.
            पालकमंत्री देशमुख म्हणाले, सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीच्या माध्यमातून गरीब आणि गरजू लोकांना धान्य दिले जाते. या विभागाच्या माध्यमातून राज्य शासन समाजातील गरजू आणि गरीब जनतेसाठी काम करीत असते. या विभागाच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी धान्य दुकानदारांनी सोलापुरात चांगले काम केले आहे. यापुढेही अन्न धान्य वितरण व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा वापर करावा. यामुळे योग्य आणि गरजू लाभार्थींना अन्न धान्य वितरण करण्यात येईल.
रेशन दुकानदारांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक विचार करेल. त्याचबरोबर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात येईल. या बैठकीत रेशन दुकानदारांना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर करावयाच्या उपाययोजना यावरही चर्चा केली जाईल, असे श्री. देशमुख यांनी सांगितले.
            अन्न धान्य वितरण अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी सोलापूर शहरात ई-पॉस मशीनचा वापर अतिशय प्रभावीपणे केला जात आहे. शासनाने नुकत्याच जारी केलेल्या शासन निर्णयानुसार नवीन लाभार्थी करण्याचे कामही अन्न धान्य वितरण कार्यालया मार्फत सुरू करण्यात आले आहे, असे सांगितले.
श्रीमती जोशी यांनी सादरीकरण करून कार्यालयामार्फत केल्या जात असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला.
            यावेळी ई-पॉस मशीनव्दारे शंभर टक्के धान्य वितरण करणाऱ्या दुकानदारांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये अभिजीत सड्डू, शिवकुमार चकोले, देवदास चकोले,वीरसंगप्पा मेणसंगी, राजरत्न इंगळे, जसवा बळीगेरी, मुश्ताक अली, साजिद खान यांचा समावेश होता. यावेळी संघटनेचे वहाब शेख, बाबूराव म्हमाणे, विजय हिरेमठ यांनी मनोगत व्यक्त केले. संघटनेचे सचिव सुनील पेंटर यांनी आभार मानले.




No comments:

Post a Comment