Friday, October 5, 2018

विश्व शांती विद्यापीठाचे गोल घुमट पाहून राज्यपाल भारावले



*पुणे दि. 5: लोणीकाळभोर येथील एमआयटी विश्व शांती विदयापीठाचे विश्व शांती सभागृह (वर्ल्ड पीस डोम) आणि विश्व शांती ग्रंथालय पाहून राज्‍यपाल सी. विद्यासागर राव भारावून गेले.*
    आज राज्‍यपालांनी जागतिक शांतता घुमटाला भेट देऊन पहाणी केली. त्‍यांच्‍यासमवेत राज्‍याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हेही उपस्थित होते.
      जागतिक शांतता घुमटाचे नुकतेच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण झाले आहे.
  पुण्यासारख्या ठिकाणी जागतिक स्तरावरचे अप्रतिम ,सुंदर व देखणे सभागृह उभे करणे हे खरे तर आव्हानच असेल.पण  डॉ. विश्वनाथ कराड आणि त्यांच्या सहका-यांनी हे आव्हान पेलले आणि करून दाखविले.खरोखरच ते अभिनंदनास पात्र आहेत..याठिकाणी जागतिक स्तरावरील संत,शास्त्रज्ञ ,तत्वज्ञ  यांचे पुतळे येणाऱ्या पिढीला निश्चितच प्रेरणा देत राहतील .आपण हे सर्व पाहून भारावून गेलो,अशी भावना राज्यपालांनी व्यक्त केली.
   यावेळी डॉ. राहुल कराड आणि डॉ. मंगेश कराड यांनी घुमटाच्‍या निर्मितीमागची प्रेरक माहिती  सांगितली. 
   सन २००५ साली या विश्वशांती प्रार्थना सभागृहाच्‍या कामाला सुरूवात झाली. जगभरातील संत, तत्वज्ञ आणि शास्त्रज्ञ यांचे पुतळे या सभागृहाच्या परिसरात उभारण्यात आले असून त्‍या पुतळ्यांची पहाणीही राज्‍यपाल श्री. राव यांनी केली.
    प्रारंभी एमआयटी वर्ल्ड पीस यु‍निव्‍हर्सिटीचे संस्थापक- अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, नालंदा विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय भटकर यांनी राज्‍यपाल श्री. राव तसेच अर्थमंत्री श्री. मुनगंटीवार यांचे घुमटाची प्रतिकृती देऊन स्‍वागत केले.
यावेळी एमआयटीचे कुलगुरू इंद्रकुमार भट,डॉ. सुधीर गव्‍हाणे, जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, प्रांताधिकारी ज्‍योती कदम तसेच विविध धर्माचे अभ्यासक, विद्यार्थी  उपस्थित होते. 




No comments:

Post a Comment