Saturday, October 6, 2018

तीर्थ क्षेत्र विकास, पालखी तळ, मार्ग विकास आराखडा आढावा बैठक कामांची गती वाढविण्याबरोबरच गुणवत्तेवरही लक्ष ठेवा - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर



पुणे दि. 6: शासनाच्या सर्व विभागांनी समन्वय ठेवत तीर्थ क्षेत्र आरखड्यातील देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर, नेवासा पालखीमार्ग आणि पालखी तळांच्या विकास कामांची गती वाढविण्याबरोबरच कामांच्या गुणवत्तेवरही लक्ष ठेवण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिल्या.
                येथील विधानभवनाच्या सभागृहात विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली श्री क्षेत्र देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर, नेवासा पालखी तळ, मार्ग विकासा आराखडा विषयी आढावा बैठक पार पडली. यावेळी पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, तीर्थक्षेत्र विकासचे विशेष कार्यअधिकारी उत्तम चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
                डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, तीर्थ क्षेत्र विकास आरखड्यांतर्गत कोणत्याही कामांना यापुढे कार्योत्तर मंजूरी दिली जाणार नाही, असे करणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल तसेच आराखड्यातील कामे परस्पर बदलणाऱ्या एजन्सीची कामे काढून घेवून त्यांना काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना दिल्या. तसेच पालखीमार्ग, पालखीतळ विकासांतर्गत कामांसाठी समन्वयाने चर्चा करून भूसंपादनाचे प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
                या बैठकीत पंढरपूर येथील नवीन दिंडी पालखीतळ शेगाव दुमला रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड करणे या कामास सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणे, तसेच येथील 65 एकर क्षेत्रातील एमटीडीसी च्या पाठीमागील जागेत मुरमीकरण करून प्लॉट पाडणे, सोलापूर जिल्ह्यातील भंडीशेगाव, पिराची कुरोली येथील पालखीत तळाच्या ठिकाणी सेप्टीक टँक बांधणे या कामांस प्रशासकीय मान्यता देणे, पंढरपूर-पिराची कुरोली या रस्त्याचे सर्वेक्षण करून या कामाच्या अंदाज पत्रकास प्रशासकीय मान्यता देणे, पंढरपूर येथील महात्मा फुले ते गोपाळपूर चौक रस्ता रूंदीकरण व सुधारणा करण्यासाठी विद्युत वाहिनीचे स्थलांतर करणे, पंढरपूर येथील 65 एकर क्षेत्रामध्ये पोलिसांसाठी 6 लोखंडी वॉच टॉवर बांधणे तसेच या ठिकाणच्या प्रवेशव्दाराजवळ उजव्या बाजूला आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे बांधकाम करण्यास प्रशासकीय मंजूरी मिळण्याबाबत चर्चा करण्यात आली.
                अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा विकास आरखड्यांतर्गत ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसरातील उद्यान संरक्षण भिंत बांधणे, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनपट आणि ज्ञानेश्वरीवर आधारीत चित्र व ध्वनीफित तयार करणे या कामांच्या प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. पालखी तळाच्या ठिकाणी कायमस्वरूपी स्वच्छतागृहे बांधणे तसेच याकामी निर्मलवारी अभियानांतर्गत सदस्यांना सहभागी करून घेण्यावर चर्चा झाली. तसेच मंगळवेढा येथील संत चोखामेळा यांच्या स्मारक उभारणीचा आढावा घेण्यात आला. विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या दर्शन मंडपास मिळणाऱ्या स्कायवॉकच्या उभारणीचे सादरीकरण करण्यात आले.
यावेळी पुणे, सोलापूर, सातारा, अहमदनगर या जिल्ह्यांना आरखड्यातून मंजूर झालेल्या निधीच्या खर्चाचा आढावा डॉ. म्हैसेकर यांनी घेवून कामांच्या दर्जावर प्रत्येक यंत्रणेने लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या.




*****

No comments:

Post a Comment