Wednesday, October 3, 2018

पोषण माह अभियानाचा समारोप


पुणे दि. 3 –एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रकल्पातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पोषण माहच्या पोषण अभियानाचा समारोप शुक्रवारी रॅलीने करण्यात आला. यावेळी महापौर मुक्ता टिळक, उपजिल्हाधिकारी सुधीर जोशी व एनएफएआयचे श्री. अजमेरा, बेटी बचाओ, बेटी पढाओ जनआंदोलनाचे डॉ. गणेश राख व त्यांचे सहकारी तसेच यार्दी या स्वयंसेवी संस्थेच्या सीएसआरचे अध्यक्ष मनोज भावसार आदी उपस्थित होते.
महिला व बालविकास विभागाच्या उपआयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पोषण माह हा. दिनांक १ सप्टेंबर 2018  ते 30 सप्टेंबर 2018 असा साजरा करण्यात आला.  या महिन्यामध्ये सर्व अंगणवाड्यांमधून स्वच्छता अभियान, आरोग्य तपासणी, लसीकरण, गृहभेटी, डोहाळ जेवण, पाककला स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, सदृढ बालक स्पर्धा अशा अनेक प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात शहरातील अनेक स्वयंसेवी संस्था व लोकप्रतिनिधींनी सहभाग घेतला.
पोषण माह रॅलीची सुरूवात झाशीची राणी पुतळा, बालगंधर्व चौक येथून महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते झाली. रॅलीमध्ये सुमारे 600 अंगणवाडी सेविका व मुख्य सेविका उपस्थित होत्या. रॅलीच्या सुरूवातीला लायन्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. बेटी बचाओ, बेटी पढाओ जनआंदोलनामार्फत सर्व उपस्थितांना टोप्यांचे वाटप करण्यात आले. रॅलीदरम्यान संदेश देणाऱ्या  मशालीचे प्रज्वलन करण्यात आले. सुरूवातीला ढोल पथक व पथनाट्य सादर करण्यात आले. त्यानंतर पुणे महानगरपालिका भवन येथे पथनाट्य सादर करण्यात आले. त्याठिकाणी आयुक्त श्रीमती कळसकर यांनी रॅलीच्या वतीने स्वागत करून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनमालधक्का चौक, पुणे येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.
मुख्य कार्यक्रमात डॉ. गणेश राख यांनी त्यांचे आजपर्यंतच्या कामाचे व आंदोलनातील अनुभवाचे कथन करून स्त्री भ्रूण हत्येवर व त्याच्या प्रतिबंधावर प्रकाश टाकला. श्री. जोशी यांनी फिल्म इन्स्टिट्यूटच्या साहाय्याने आपण एकात्मिक बालविकास सेवा योजना व उपक्रम अधिक जनसामान्यांपर्यंत कसे पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे असे सांगितले.
महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त श्री. हिवराळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मुख्यसेविका श्रीमती भिलारे यांनी आभार मानले. बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती ओव्हाळ यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने पोषण अभियान सप्टेंबर 2018  या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
*****

No comments:

Post a Comment