Saturday, October 6, 2018

फिरते लोकअदालत या अभियानाचा नागरीकांनी लाभ घ्यावा -जिल्हा न्यायाधिश अ.ज.पाटंगणकर


 पंढरपूर, दि. 06 :- महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकरण  उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार तालुक्यात विधी सेवा समितीच्या वतीने फिरते लोकअदालत व साक्षरता शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच  दुर्बल व गोरगरीबांच्या हक्काचे व हिताचे रक्षण व जोपासणा करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून, त्याचा नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा न्यायाधिश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष अ.ज.पाटंगणकर यांनी केले आहे.
फिरते लोकअदालत व साक्षरता शिबीर अभियान आयोजनाबाबत जिल्हा न्यायालय पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. या बैठकीस पंचायत समिती सभापती राजेंद्र पाटील, उपसभापती अरुण घोलप, नायब तहसिलदार एस.पी.तिटकारे, सहायक पोलीस निरिक्षक श्याम बुवा यांच्यासह तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  
 नागरीकांना सन्मानाने व स्वाभिमानाने जगण्यासाठी त्यांना त्यांचे मूलभूत अधिकार प्राप्त करुन देण्यासाठी तालुक्यातील ग्रामीण भागात जावून लोक अदालत व साक्षरता शिबीराच्या माध्यमातून न्यायाधिश, विधीज्ञ  हे मार्गदर्शन विधी सेवा व सहाय देणार आहेत. या अभियानांतर्गत तालुक्यातील दिनांक 19 ऑक्टोबर रोजी भोसे येथे,  दिनांक 20 ऑक्टोबर रोजी भाळवणी येथे तसेच  दिनांक 22 ऑक्टोबर रोजी  तुंगत येथे फिरते लोकअदालत व साक्षरता शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा न्यायाधिश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष अ.ज.पाटंगणकर यांनी सांगितले आहे. तसेच  विधीज्ञ संघाचे अध्यक्षॲड.भगवान मुळे यांनी या फिरते लोकअदालतीमध्ये जास्तीत-जास्त नागरीकांनी आपली प्रकरणे मिटवावेत असे सांगितले.
                                      00000

No comments:

Post a Comment