Friday, October 5, 2018

टंचाईच्या स्थितीबाबत काटेकोर नियोजन करा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या सूचना


सोलापूर, दि. ५ - दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील टंचाईची  संभाव्य स्थिती लक्षात घेऊन पाणी, जनावरांसाठी चारा याबाबत काटेकोर नियोजन करा, अशा सूचना सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे दिल्या.
            दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील टंचाईच्या स्थिती आणि करावयाच्या उपाययोजना याबाबत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीस दोन्ही तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.
            श्री. देशमुख यांनी सांगितले की, 'दोन्ही तालुक्यातील पावसाची परिस्थिती पाहता पाणी आणि चारा यांची स्थिती समाधानकारक नाही. त्यामुळे टंचाईच्या अनुषंगाने असणाऱ्या उपाययोजना सर्व विभागांनी कराव्यात.   ज्या गावांमध्ये पाणी पुरवठा योजना बंद आहेत त्यांची दुरुस्ती करावी. आवश्यकतेनुसार विहीर अधिग्रहण करण्यासाठी  उपाययोजना कराव्यात.'
            उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील आणि शिवाजी जगताप यांनी दोन्ही तालुक्यातील वस्तुस्थिती मांडली. टंचाईची शक्यता गृहीत धरून करण्यात आलेल्या उपाय योजनांची माहिती त्यांनी दिली.
            यावेळी दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या सभापती सोनाली कडते, उपसभापती रजनी भडकुंबे, माजी सभापती ताराबाई पाटील, सदस्या रेखा नवगिरे, शहाजी पवार, इंद्रजीत पवार, आप्पा पाटील, काशीनाथ कदम आदी उपस्थित होते.
            बैठकीस उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील, शिवाजी जगताप, तहसीलदार अमोल कदम, विनोद रणवरे, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पशुसंवर्धन आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
                                     ‘समाधान शिबिराचे आयोजन करावे'
            नागरिकांना शासनाच्या विविध योजना माहिती होण्यासाठी समाधान शिबिराचे आयोजन करा, असेही सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. टंचाईच्या काळात तलाठी आणि ग्रामसेवक यांनी त्यांच्या वेळापत्रकानुसार गावात उपस्थित रहावे, अशा सूचना दिल्या जाव्यात, असेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment