Wednesday, October 17, 2018

टंचाईवर मात करण्यास शासन कटीबद्ध - पालकमंत्री विजय देशमुख यांचा शेतकऱ्यांना दिलासा






            

             सोलापूर दि.16 :-  जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे पाण्याअभावी खरिपाचे  पीक निघाले नाही,  रब्बीची पेरणी झाली नाही. यामुळे जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन कटीबद्ध असून शेतकऱ्यांनी निर्धास्त रहावे, असा दिलासा पालकमंत्री विजय देशमुख यांनी आज बार्शी येथे बोलतांना दिला.
            कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी येथे टंचाई परिस्थितीबाबत आयोजित केलेल्या बैठकीत पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी माजी आमदार राजाभाऊ राऊत, जिल्हा परिषद सदस्य किरण मोरे, श्रीमंत थोरात, तहसीलदार ऋषिकेश शेळके,गटविकास अधिकारी प्रमोद काळे, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र चौधरी यांच्यासह संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
            पालकमंत्री  देशमुख म्हणाले, ‘जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्व परिस्थितीचा अहवाल संबधीत यंत्रणा मार्फत घेतला जाईल. संभाव्य काळात पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या चाऱ्याची टंचाई भासणार नाही, या दृष्टीने आवश्यक उपाय - योजना केल्या जातील.  पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरु करण्यासाठी प्रस्ताव आल्यास त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल. टंचाई काळात जनावरांच्या चारा, रोजगार हमीच्या कामांना प्राधान्य देण्यात येईल. जलयुक्त शिवार योजनेमुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असून, या पुढेही नाला सरळीकरण, खोलीकरण आदी कामे लोकसहभागातुन सुरु करावीत’.
             तहसीलदार शेळके यांनी तालुक्यातील टंचाई परिस्थितीबाबत माहिती दिली.
            पालकमंत्री देशमुख यांनी बार्शी तालुक्यातील श्रीपत पिंपरी येथील रामराजे सुरवसे यांच्या तूर व ऊस, शेंद्री येथील बाळासाहेब कासार, हनुमंत मोरे  खांडवी येथील सुरेश शेळके व सुभाष माळी यांच्या पिकांची पाहणी करुन  शेतकऱ्याशी सवांद साधला.  उपळाई  येथील बार्शी उपसा सिंचन योजनेअंतर्गत वितरण केंद्राला पालकमंत्री देशमुख यांनी भेट देऊन योजनेची अपूर्ण असलेली कामे सुरु करण्याबाबत  कार्यवाही केली जाईल, असे सांगितले.
*****

No comments:

Post a Comment