Monday, October 1, 2018

माजी सैनिकांचे प्रश्‍न सोडविण्‍यासाठी बैठक – जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम


पुणे, दिनांक 1 – माजी सैनिकांचे प्रश्‍न सोडविण्‍यासाठी लवकरच एक बैठक घेण्‍यात येणार असून या फोरमच्‍या माध्‍यमातून सैनिकांचे, माजी सैनिकांचे प्रश्‍न मार्गी लावू, असे जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी मेजर मिलींद तुंगार यांनी याबाबत समन्‍वय करावा,असेही त्‍यांनी सांगितले.
  आपल्‍या समस्‍यांबाबत मला सैनिकांचे फोन येतात, त्‍यांचे खरे काम असते म्‍हणूनच ते फोन करतात. त्‍यांच्‍या तक्रारी दूर करण्‍यासाठी मी नेहमीच प्राधान्‍य देतो,असे सांगून जिल्‍हाधिकारी राम यांनी औरंगाबादमध्‍ये जिल्‍हाधिकारी म्‍हणून काम करतांनाचा अनुभव सांगितला. सीमेवर जवान सदोदीत कार्यरत असतात म्‍हणून आपण शांतपणे जीवन जगत असतो, याची प्रत्येक भारतीयाने जाणीव ठेवली पाहिजे,असेही ते म्‍हणाले. सीमाभागात सर्वसामान्‍य माणूस राहू शकत नाही, अशी नैसर्गिक परिस्थिती असते. पण त्यावर मात करत सैनिक मायभूमीचे संरक्षण करीत असतात. या सैनिकांप्रती आदराची भावना म्‍हणून प्रत्येक नागरिकाने ध्‍वजदिन निधी, शौर्य दिनासारख्‍या उपक्रमांमध्‍ये सहभागी व्‍हायला हवे, अशी अपेक्षा जिल्‍हाधिकारी राम यांनी व्‍यक्‍त केली. माजी सैनिकांना नैतिक पाठबळ देवून शक्‍य ती मदत करण्‍यावर आपला भर असेल असे सांगून जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी तुंगार यांनी याबाबत समन्‍वय करावा, असे जिल्‍हाधिकारी राम म्‍हणाले.

00000

No comments:

Post a Comment