Thursday, December 15, 2016

कवीवर्य सुरेश भट सभागृह नागपूरचे वैभव ठरेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


·        2 हजार आसन क्षमता
·        73 कोटी रुपये खर्च  


नागपूर, दि. 15 : येथील महानगरपालिकेच्या वतीने मध्य,पूर्व आणि दक्षिण नागपुरातील जनतेच्या सोयीसाठी रेशीमबाग मैदान परिसरात कविवर्य सुरेश भट यांच्या नावाने भव्य सभागृह बांधण्यात येणार आहे. या सभागृहाच्या बांधकामासाठी सुमारे 73 कोटी रुपये खर्च येणार असून या सभागृहाच्या बांधकामाची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी केली.
महापौर प्रविण दटके, मनपाचे आयुक्त श्रावण हर्डीकर, मनपाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार, शहर अभियंता श्री. तालेवार अन्य वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
महापालिकेतर्फे बांधण्यात येणारे सभागृह हे नागपूर शहराच्या वैभवात भर घालणारे असून या सभागृहाच्या बांधकामावर आतापर्यंत 35 कोटी  रुपये खर्च झाला आहे. यातील भव्य प्रेक्षागृहाची एकूण प्रेक्षक क्षमता 2 हजार असून, तळमजल्यावर 1400 प्रेक्षक तर बाल्कनीत 600 प्रेक्षक क्षमता आहे. या शिवाय भव्य प्रेक्षागृह मंच असून 12 ग्रीन रुम्स, 2 व्हीआयपी रुम्स आहेत. नागपूर शहरातील सर्वात मोठ्या क्षमतेचे हे भव्य सभागृह राहाणार आहे. या सभागृहाची उंची 27 मीटर आहे. एकुण बांधकाम 9870 चौरस मीटरचे आहे. याशिवाय या सभागृहात प्रशस्त कॉन्फरन्स रुम, प्रदर्शन हॉल, 20 व्यक्ती एकावेळी वाहून नेण्याची क्षमता असलेली लिफ्ट, 200 केवी क्षमतेची सोलर वीज निर्मिती होईल अशी यंत्रणा, संपूर्ण सभागृह वातानुकूलित आहे. अपंगासाठी स्वतंत्र प्रसाधन गृह आहे. उच्च दर्जाची ध्वनीक्षेपण व विद्युत व्यवस्था असलेल्या या सभागृहाची व त्यातील सर्व सोयी सुविधांची मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी पाहणी करुन समाधान व्यक्त केले. सभागृह बांधकामाचे आर्किटेक्ट अशोक मोखा यांना आवश्यकत्या सूचनाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केल्या.
प्रारंभी मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मुख्य अभियंता उल्हास देबडवार आणि आर्किटेक्ट श्री.मोखा यांनी सभागृह बांधकामाची माहिती दिली. नियोजित सभागृहाची सिडी यावेळी मुख्यमंत्र्यांना दाखविण्यात आली.
०००००



No comments:

Post a Comment