Saturday, December 31, 2016

लडकतवाडी पुनर्वसन योजनेचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्याहस्ते भूमिपूजन

    
            पुणे, दि. 31– झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत विकसीत करण्यात येणाऱ्या  लडकतवाडी पुनर्वसन योजनेचे भूमिपूजन आज पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्याहस्ते झाले. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, नगरसेवक सर्वश्री विनायक हनमघर, धनंजय जाधव उपस्थित होते.
            लडकतवाडी येथे विकसित करण्यात येणाऱ्या या गृहनिर्माण योजनेद्वारे 56 कुटूबियांना हक्काचे घर मिळणार आहे. विकसीत करण्यात येणारी इमारत आठ मजली असून या इमारतीमध्ये रहिवाशांना सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सोई सुविधा पुरविण्यात येणार आहेत. रहिवाशांच्या गरजा पूर्ण होण्यासाठी या इमारतीमध्ये व्यावसायिक आस्थापनांना गाळे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
            यावेळी बोलताना पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले की, कमी उत्पन्न गटातल्या नागरिकांसाठी बांधण्यात येणाऱ्या गृहनिर्माण योजनांना राज्यशासन सर्वप्रकारच्या सवलती देत आहे. झेापडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये शासन लवकरच नागरिकांसाठी हितकारक बदल करण्यात येणार आहेत. नवीन गृहनिर्माण योजनांसाठी विकसकांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. अशाप्रकारच्या योजनांमुळे शहरे झेापडपट्टीमुक्त होतील, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. लोकप्रतिनिंधीनी झेापडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
            आमदार माधुरी मिसाळ यांनी झेापडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये बांधण्यात येणाऱ्या इमारतीमध्ये विकसकांनी सौर उर्जेवर चालणारी उपकरणे बसविण्याची सूचना केली. सौरउर्जेवर चालणारी उपकरणे बसविल्यामुळे इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा इमारतीचा देखभाल व दुरुस्तीवरील खर्च वाचणार असल्याचे त्या म्हणाल्या.
            कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलनाने झाली. कार्यक्रमास परिसरातील नागरिक, पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
           
00000


No comments:

Post a Comment