Thursday, December 29, 2016

मांजरी नळ पाणी पुरवठा योजनेचे पाणीपुरवठा मंत्री लोणीकर यांच्याहस्ते भूमिपूजन


            पुणे, दि. 29मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मांजरी येथील नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन आज पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आमदार योगेश टिळेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
            सुमारे 42 कोटी रुपये खर्च करुन ही पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यात येणार आहे. या पाणीपुरवठा योजनेमुळे परिसरातील नागरिकांची 14.65 ..लि.पाण्याची दैनंदिन गरज भागणार असून यामुळे मांजरी व परीसरातील गावांना या योजनेमुळे शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार आहे. या पाणी पुरवठा योजनेला खडकवासला नवीन मुठा उजवा कालव्यातून पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत मांजरी गावठाण, महादेव नगर व स्टडफार्म येथे पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार आहेत.
            या योजनेच्या भूमिपूजनानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर म्हणाले की, पाणी पुरवठा योजनांना निधी कमी पडू दिला जाणार नाही. तसेच दोन वर्षात ही योजना पूर्ण होईल असे सांगितले. राज्यातील पिण्याच्या पाण्याच्या अपूर्ण योजना पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे तसेच घनकचऱ्यावर प्रक्रिया करुन तो नष्ट करणे, मलनिस्सारण योजना राबविणे यावर लक्ष देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
            आमदार योगेश टिळेकर यांनी या पाणी पुरवठा योजनेमुळे मांजरी परिसरातील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होईल असे सांगितले. मांजरी परिसराच्या विकासाच्या विविध योजनांचा शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल असे ते म्हणाले.
            या कार्यक्रमास परिसरातील ग्राम पंचायत व पंचायत समिती सदस्य, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
           



000


No comments:

Post a Comment