Thursday, December 15, 2016

देशातील परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


·         राज्यात गेल्या सहा महिन्यात 68 हजार कोटींची गुंतवणूक
·         देशातील एकूण गुंतवणुकीच्या 50 टक्के गुंतवणूक


नागपूर, दि. 15 : देशातील उद्योग क्षेत्रात गेल्या सहा महिन्यात झालेल्या एकूण परदेशी गुंतवणुकीपैकी  68 हजार कोटी रुपयांची  अर्थात50 टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली असून मोठ्या प्रमाणात जमीन, पाणी, वीज आणि दळणवळणाच्या उपलब्धतेमुळे विदर्भ हे उद्योगासाठी अनुकूल ठरत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
हॉटेल ली मेरिडियन येथे  सीआयआय आणि उद्योग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विदर्भ इन्व्हेस्टमेंट समिट ॲण्ड एक्स्पो 2016 च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, सीआयआयच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष सुधीर मेहता, महिन्द्रा ॲण्ड महिन्द्राचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पवन गोयंका आदी उपस्थित होते.
नागपूरमध्ये आशियातील सर्वात मोठा फूडपार्क निर्माण होत असून या ठिकाणी पतंजलीसारखे प्रथितयश उद्योगसमूह प्रकल्प सुरु करत आहेत. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हा विदर्भातील कृषी, कृषीपूरक उद्योग, सेवा उद्योग यासाठी मोठी संधी असून या महामार्गाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात जमिनीची उपलब्धता, मुबलक पाणी असल्यामुळे विदर्भात उद्योगांचे मोठे जाळे उभे राहणार आहे. या महामार्गावरुन कारने नागपूर ते मुंबई  जाण्यासाठी केवळ 10 तास लागणार असून जड माल वाहतूक करणारे कार्गो यांना 14 तास एवढा अवधी लागेल. हा मार्ग थेट जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टला (जेएनपीटी)जोडला जाणार असल्यामुळे लॉजिस्टिकच्या दृष्टीने हा मार्ग अतिशय सोयीचा होणार आहे. तसेच या महामार्गाला लागून गॅस, पेट्रोकेमिकल्सच्या गॅस लाईन टाकण्याचे पेट्रोलियम मंत्रालयाने तयारी दाखविली आहे. विदर्भ आणि मराठवाडा या विभागासाठी पॉवर टेरिफ पॉलिसी उपलब्ध करुन दिली असल्यामुळे या भागात उद्योग उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात उद्योजक येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
विदर्भामध्ये पर्यटनासाठी मोठी संधी असून नागपूर हे देशाचे टायगर कॅपिटल झाले आहे. तर अमरावतीत कॉटन पार्कमध्ये अनेक मोठमोठ्या उद्योगांनी आपले प्रकल्प उभे केले आहेत. अशाच प्रकारचे नऊ कॉटन पार्क येत्या काळात उभे राहणार असून, त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. 

नागपूरमध्ये उद्योगवाढीसाठी अतिशय चांगले वातावरण असून सर्व प्रकारच्या  मूलभूत सोयी उपलब्ध होत आहेत. मुंबईच्या पाठोपाठ  नागपूर येथे मेट्रो सुरु होत आहे. रस्त्याचे जाळे आणि शासनाच्या सहज उपलब्ध होणाऱ्या ऑनलाईन सुविधांमुळे गेल्या सहा महिन्यात महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक झाली असून यापुढेही ती गती अशीच कायम राहील, असा विश्वास उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.
उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा यांनी महाराष्ट्रात येणाऱ्या उद्योगासाठीच्या संधी व मूलभूत सुविधा यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.  यावेळी विदर्भाच्या विकासावर आधारित माहितीपट दाखविण्यात आला. विदर्भ-रिलीझिंग पोटेंशियल  या रिपोर्टचे प्रकाशन करण्यात आले. तसेच टुरिझम इंडस्ट्रीज इन महाराष्ट्र : फोकस विदर्भ या पुस्तिकेचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले. युवकांसाठी द इंडिया वुई वॉन्टया विषयावरील निबंध स्पर्धेच्या पोर्टलचेही यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
******* 

No comments:

Post a Comment