Wednesday, December 7, 2016

महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक वाटचालीत स्व. वसंतदादा पाटील यांचे महत्त्वपूर्ण योगदान -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


          नागपूर, दि. 7 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांचे महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक वाटचालीत महत्त्वपूर्ण योगदान असून त्यांनी ज्या  विविध क्षेत्रांत काम केले, त्या क्षेत्रातील सर्वसामान्यांपर्यंत विकासाची फळे पोहचावीत यासाठी प्रयत्न करणे हीच त्यांना आदरांजली ठरेल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत काढले.                      
          महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा बंडूजी पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून त्यांनी महाराष्ट्र राज्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत मांडला. या प्रस्तावावर ते बोलत होते.
          यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास स्व. वसंतदादा पाटील यांच्या कर्तृत्वाच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. स्व. वसंतदादांचे नेतृत्व हे स्वतःच्या कार्यकर्तृत्वाने तयार झालेले नेतृत्व होते. सहकार, शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ते वयाच्या 20 व्या वर्षी ते सहभागी झाले.भारत छोडो आंदोलनात त्यांची सक्रिय भूमिका होती. त्यामुळेच तेस्वातंत्र्य सेनानीच नव्हे तर खरे क्रांतिकारी होते.त्यांचा चित्तथरारक, रोमहर्षक इतिहास सातारा गॅझेटियरमध्ये प्रसिद्ध झाला आहे. राज्याच्या ग्रामविकासाला गती देत असताना त्यांनी सहकार आणि शिक्षणालाही महत्व दिले.
          महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी चारवेळा आरुढ होऊनही ते सामान्यातल्या सामान्य माणसाला भेटत असल्याने ते लोकप्रिय मुख्यमंत्री झाले होते.पाणी अडवा, पाणी जिरवाच्या माध्यमातून त्यांचे जलसंधारणविषयक कामही मोठे होते. त्याचबरोबर त्यांची प्रशासनावर प्रचंड पकड होती. शिक्षणाचे व्यावसायिकीकरण होऊ नये यासाठी त्यांनी काम केले.जिल्हा परिषदेअंतर्गत बदल्यांचा महत्वपूर्ण निर्णयही त्यांच्याच काळात झाला. ते मुख्यमंत्री असताना शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांत केवळ सहा हजार जागा होत्या, सर्वसामान्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयांनाही परवानगी दिली. शिक्षणाच्या या विस्तारीकरणामुळेच सर्वसामान्यांना शिक्षण घेता आलेत्याचे सर्व श्रेय स्व. वसंतदादा पाटील यांनाच जाते.शिक्षणाच्या कोर्सेसमधून किती रोजगार उपलब्ध होतो याचाही विचार केला जावा, असे त्यांचे धोरण होते. 
          विदर्भ- मराठवाड्याचा अनुशेष वमागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठीत्यांनी दांडेकर समिती नेमली. त्यामुळेच या भागाचा अनुशेष भरुन काढण्यास मदत झाली. स्व. वसंतदादा पाटील यांच्या विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार दिला. अशा या जननेत्याबद्दल ही विधानसभा कृतज्ञता व्यक्त करीत असून त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी राज्य शासनामार्फत समिती गठित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
          या प्रस्तावावर बोलताना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले की, राज्याच्या विकासासाठी स्व. वसंतदादा पाटलांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, सदस्य सर्वश्री अजित पवार, पतंगराव कदम, गणपतराव देशमुख यांनीही स्व. वसंतदादा पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला.
००००

No comments:

Post a Comment