Wednesday, December 7, 2016

रेशन दुकानांवरील धान्य बायोमेट्रिकद्वारे वितरीत करणार - मुख्यमंत्री


       नागपूर, दि. 7 : रेशन दुकानांवरील धान्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी धान्य वितरणाची पद्धती बायोमेट्रिक करण्यात येणार असून यासाठी पुढील 3 महिन्यात सर्व रेशन दुकानदारांना पीओएस मशिन (POS Machine)देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.
वसई जिल्हा पालघर तालुक्यात शिधावाटप धान्याचा काळाबाजार होत असल्याबाबतचा प्रश्न आमदार क्षितीज ठाकूर यांनी विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.
          यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, राज्यातील धान्य वितरणाची पद्धती बायोमेट्रिक करण्यात येत असून आतापर्यंत सर्व रेशन शिधापत्रिका आधार सिडींग करत असताना एक कोटीपेक्षा अधिक रेशनकार्ड बनावट असल्याचे आढळून आले आहे. तर 70 लाख लाभार्थी कमी झाले आहेत. रेशनचा काळाबाजार रोखण्यासाठी धान्य वितरणाची संपूर्ण पद्धत बायोमेट्रिक करण्यात येत आहे.
          रास्तभाव दुकानदार शिवनसई, ता. वसई, जि. पालघर येथील श्री. चंद्रकांत काथेड-जाधव व पीकअप टेंपोचे चालक व मालक राजाराम केवलराम पटेल या दोघांवर जीवनावश्यक वस्तु कायदा 1955 चे कलम 3 व 7 अन्वये विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 8 हजार 400 रुपये किंमतीचा गहू व 3 लाख 50 हजार रुपयांचा टेंपो जप्त करण्यात आला आहे तर, रास्तभाव दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. तसेच  या गावातील शिधापत्रिकाधारकांना शेजारच्या गावातील दुकानास जोडण्यात आल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहकसंरक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.
          या प्रश्नाच्या चर्चेत आमदार सर्वश्री हितेंद्र ठाकूर, अस्लम शेख, अजित पवार, राजेंद्र जैन यांनी सहभाग घेतला.

000

No comments:

Post a Comment