Friday, December 30, 2016

विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सर्व सुविधा पुरविण्यात याव्यात समन्वय समितीच्या बैठकीत पालकमंत्री गिरीश बापट यांच्या सूचना


            पुणेदि30 पेरणेफाटा, ता.हवेली येथील विजयस्तंभास 1 जानेवारी रोजी मोठया प्रमाणावर नागरिक अभिवादन करण्यासाठी येतात. अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने सर्व प्रकारच्या सुविधा पुरव्याव्यात, अशी सूचना पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आज येथे समन्वय समितीच्या बैठकीत दिल्या.
            पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.जय जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, हवेली उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, विविध विभागांचे अधिकारी, आयोजन समितीचे पदाधिकारी सर्वश्री परशुराम वाडेकर, महेंद्र कांबळे, संजय सोनावणे, महेश शिंदे, डॉ.सिध्दार्थ धेंडे, महिपाल वाघमारे, बाबुराव दहाडगे उपस्थित होते.
            पालकमंत्री गिरीश बापट यांनी यावेळी विजयस्तंभास भेट देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या सोयी सुविधांचा आढावा घेतला. वैद्यकीय सेवा, पिण्याचे पाणी, वाहनाच्या पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करणे, ॲम्बुलन्स, अग्नीशमन दलाची वाहने, परिसराची साफसफाई करुन घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. विक्रेत्यांनी अतिक्रमण करु नये, हॉटेल आणि अन्न पदार्थांच्या विक्रीच्या स्टॉलची तपासणी करा होमगार्डची संख्या वाढवा इत्यादी उपाययोजना प्रशासनाने कराव्यात, अशा सूचनाही यावेळी पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. संयोजन समितीचे पदाधिकारी यांनी प्रशासनाशी ताळमेळ ठेवून मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
            विजयस्तंभास भेट देण्यासाठी राज्यातून मोठया प्रमाणावर नागरिक येतात. यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांची नियमित बैठक घेण्यात यावी, असे बैठकीत निश्चित करण्यात आले.
बैठकीस जिल्हयातील प्रांताधिकारी, तहसिलदार, सार्वजनिक बांधकाम, विद्युत वितरण, आरोग्य विभाग, महानगरपालिकांचे अधिकारी, विजयस्तंभ अभिवादन समित्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
000000

No comments:

Post a Comment