Thursday, December 15, 2016

महावितरणच्या निगा व देखभाल दुरुस्तीसाठी साडेचार हजार कोटींचा आराखडा तयार


ग्रामपंचायतीने ग्राम विद्युत व्यवस्थापकाची नेमणूक न केल्यास महावितरण नेमणूक करणार
नागपूर, दि. 15 : राज्यातील लघुदाब उपरी तारमार्गाची योग्य ती निगा व देखभाल दुरुस्ती करण्यासाठी महावितरणने साडेचार हजार कोटींचा आराखडा तयार केला आहे. त्याचबरोबर देखभालीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीस ग्राम विद्युत व्यवस्थापक नेमण्याचे सुचविण्यात आले आहे. ग्रामपंचायतीने तीन महिन्यांच्या आत ग्राम विद्युत व्यवस्थापकाची नेमणूक न केल्यास अशी नेमणूक महावितरणमार्फत करण्यात येईल, असे आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिले.
रुकडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे शॉर्टसर्किटमुळे ऊस पिकाचे नुकसान झाल्याबाबतचा प्रश्न राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना श्री. बावनकुळे बोलत होते.
श्री. बावनकुळे पुढे म्हणाले की, रुकडी येथील ऊस जळित हे लघुदाब उपरी तारमार्गाची योग्य ती निगा व देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे झालेला आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, इचलकरंजी यांना सदरची नुकसान भरपाई देण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. पंधरा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी तेरा शेतकऱ्यांच्या प्रस्तावाची मंजुरी प्रक्रिया सुरु आहे. उर्वरित शेतकऱ्यांचे प्रस्ताव कागदपत्रांअभावी प्रलंबित आहे. अशा जळित प्रकरणाची नुकसान भरपाई देण्यासाठी आठ अधिकाऱ्यांचा अहवाल आवश्यक असतो. त्यामुळे नुकसानभरपाई देण्यास विलंब होत असला तरी यापुढे शेतकऱ्यांना जळित पिकांची नुकसान भरपाई तत्काळ मिळण्यासाठी नुकसान भरपाईचा अर्ज ऑनलाईन घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येत असल्याची माहितीही श्री. बावनकुळे यांनी दिली.
त्याचबरोबर,राज्यातील वीज वाहिन्या या 50 वर्षांपूर्वीच्या आहेत. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतातील पोल व तारांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. या दुरुस्तीसाठी महावितरणने साडेचार हजार कोटींचा आराखडा तयार केला आहे. याबाबत विरोधी पक्षनेते आणि विविध पक्षांच्या गटनेत्यांशी चर्चा करुन नुकसान भरपाईचे धोरण ठरविण्यात येईल, असेही श्री. बावनकुळे यांनी यावेळी विचारण्यात आलेल्या उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
राज्यात लाईनमनच्या जागा रिक्त असल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीस ग्राम विद्युत व्यवस्थापक नेमण्याची परवानगी देण्यात आली असून जी ग्रामपंचायत तीन महिन्यांआत विद्युत व्यवस्थापकाची नेमणूक करणार नाही अशा गावात महावितरण विद्युत व्यवस्थापक नेमण्याची कार्यवाही करेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या प्रश्नाच्या चर्चेत डॉ. सुजित मिणचेकर, बाळासाहेब पाटील, ॲड आशिष देशमुख, बाळासाहेब थोरात, जयकुमार गोरे आदी सदस्यांनी सहभाग घेतला.
०००००

No comments:

Post a Comment